corona virus-जिल्ह्यात चार ठिकाणी चेक पोस्ट तात्काळ सुरू करा : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:38 AM2020-03-21T11:38:44+5:302020-03-21T11:40:06+5:30
सांगली : परदेश वारी करून तसेच होम क्वॉरंटाईनचा स्टँम्प लावलेल्या व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असल्यास, अशा प्रवाशांची ...
सांगली : परदेश वारी करून तसेच होम क्वॉरंटाईनचा स्टँम्प लावलेल्या व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असल्यास, अशा प्रवाशांची तपासणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यात पेठ, अंकली, कडेगाव व नागज येथे तात्काळ चेक पोस्ट सुरू करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने वाहतूक आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, रेल्वे विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
परदेश वारी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जिल्ह्यात येत असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी पेठ, अंकली, कडेगाव व नागज या ठिकाणी चेक पोस्ट तात्काळ सुरू करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या प्रत्येक चेक पोस्टवर संबंधित ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक शिफ्टमध्ये आरोग्य विभागाचे दोन, पोलीस विभागाचे दोन व आरटीओ विभागाचा एक कर्मचारी या प्रमाणे तीन शिफ्टमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
याबाबत संनिंयंत्रणासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाई करावी. प्रत्येक चेक पोस्टवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या ठिकाणी परदेश वारी करून कोणी प्रवासी येत आहे किंवा कसे याची तपासणी करावी. यामध्ये परदेश वारी करून येणारा प्रवासी असल्यास त्याला स्टँम्पींग करावे. तसेच होम क्वारंटाईनचा स्टँम्प लावलेली व्यक्ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून प्रवास करत असल्यास त्यांची तपासणी करावी.
ज्या व्यक्तींना काही त्रास तसेच काही लक्षणे दिसत असल्यास त्याप्रमाणे ज्यांना आयसोलेशन कक्षात ठेवणे आवश्यक आहे त्यांना आयसोलेशन कक्षामध्ये पाठवावे व ज्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवणे आवश्यक आहे ते होम क्वॉरंटाईनच्या ठिकाणी पोहचतील याची खातरजमा करावी. चेक पोस्टवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे आजच प्रशिक्षण आयोजित करून त्यांना चेक पोस्टवर करण्यात येणाऱ्या तपासणीबाबत व पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
याप्रमाणेच रेल्वे विभागानेही मिरज व सांगली रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आवश्यक पथक नेमावे. नियुक्त करण्यात आलेली पथके 24 तास कार्यरत ठेवावीत व आजपासूनच ही कार्यवाही सुरू करावी. यासाठी आवश्यक काही स्टाफ महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.