corona virus : धक्कादायक...महिलेचा मृतदेह सहा तास ताटकळत ठेवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:52 PM2020-07-24T17:52:40+5:302020-07-24T17:56:53+5:30
महापालिकेच्या असंवेदनशीलतेमुळे ७५ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह सहा तास ताटकळत ठेवावा लागला. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा दूरध्वनी करूनही मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली नाही.
सांगली : महापालिकेच्या असंवेदनशीलतेमुळे ७५ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह सहा तास ताटकळत ठेवावा लागला. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा दूरध्वनी करूनही मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली नाही.
रात्री तीन वाजता परिसरातील तरुणांनी पीपीई कीट घालून मृतदेह रुग्णालयात दाखल केला. शुक्रवारी या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुधवारी रात्री फौजदार गल्लीत घडली.
फौजदार गल्लीत ७५ वर्षीय महिला राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. मूलबाळ नसल्याने ती एकटीच होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास तिला त्रास होऊ लागला तिच्या दूरच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते युनुस महात यांना कळवले महात यांनी नगरसेवक करीत मिस्त्री यांना मदतीला बोलावले. तोपर्यंत गल्लीतील काही तरुण मंडळीही वृद्ध महिलेच्या घरात समोर जमा झाली.
महात व मिस्त्री यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे संपर्क साधून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच खणभाग आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. शबाना लांडगे यांनाही माहिती देण्यात आली. लांडगे या तातडीने फौजदार गल्लीतल्या तोपर्यंत वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली होती.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले तर एकाने तर चालत नसल्याचे कारण दिले. यात तासभराचा वेळ गेला अधिकाऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेला फोन करण्याचा सल्लाही देऊन हात झटकले अखेर महात त्यांनी 108 रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला. पंधरा ते वीस मिनिटात ही रुग्णवाहिका फौजदार गल्लीत आली. पण त्यांनी मृतदेह नेण्यास असमर्थता दाखविली.
नागरिकांनी नगरसेवक अभिजीत भोसले यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली भोसले ही घटनास्थळी आले त्यांनीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सांगितले पण रात्री तीन वाजेपर्यंत अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
कधी रुग्णवाहिका नाही, चालक नाही तर कधी पीपीई कीट नसल्याचे सांगत टाळाटाळ सुरू होती. शेवटी तर मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारी नसल्याचे कारण देण्यात आले. त्यावर फौजदार गल्लीतील सलमान मिस्त्री व इतर तरुणांनी मृतदेह रुग्णालयापर्यंत नेण्याचे जबाबदारी घेतले हा सारा गोंधळ तब्बल सहा तास सुरू होता.
तरुण सरसावले
महापालिकेने पहाटे तीनच्या सुमारास रुग्णवाहिका पाठवून दिली. सलमान मिस्त्री व त्याच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरच पीपीई कीट घातले. या तरुणांनी मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला आणि रुग्णालयात दाखल केला. शुक्रवारी सकाळी या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता या मृत महिलेच्या घराभोवती कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे.