कोरोना रोखायचा, पण निधी कोठून आणणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:42+5:302021-04-14T04:23:42+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ५२ हजार रुग्णांपैकी १८ हजार रुग्ण शहरातील आहेत. ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ५२ हजार रुग्णांपैकी १८ हजार रुग्ण शहरातील आहेत. कोरोना रोखण्यासाठी महापालिकेकडून दिवसरात्र प्रयत्न केले जात आहेत. कोरोना उपाययोजनांवर आजअखेर दहा कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी पावणे तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून मिळाला आहे. उर्वरित निधीची तरतूद महापालिकेने केली. आताही कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास आयुक्त नितीन कापडणीस यांनी बोलून दाखविला.
गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत महापालिकेने कोरोनाला वेशीवर रोखले होते. पण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत कोरोनाचा विस्फोट झाला. आताही परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महापालिका हद्दीत दररोज ९० ते १०० रुग्ण सापडू लागले आहेत. महापालिकेने दोन कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. शिवाय आदिसागर कोविड रुग्णालय सुरू करण्याची तयारीही केली आहे. त्याच्या खर्चाचा सारा भार महापालिकेच्या तिजोरीवर आहे. आतापर्यंत कोरोना उपाययोजना, लसीकरण, अँटीजेन चाचण्यांसाठी पावणे तीन कोटींचा निधी मिळाला आहे. तर पालिकेने तिजोरीतून आठ ते दहा कोटी खर्च केले आहेत.
चौकट
निधीची अडचण नाही
कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत तरी महापालिकेला निधीची अडचण भासलेली नाही. आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना संकटाचा अंदाज घेत गतवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातच आर्थिक नियोजन केले होते. शहरातील किरकोळ विकासकामे थांबविण्यात आली होती. या कामासाठी तरतूद केलेला निधी कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आला.
चौकट
कोविड केअर सेंटर वाढवायचे, पण...
गतवर्षी महापालिकेने चार कोविड सेंटर व एका कोविड रुग्णालयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. आताही मिरज पाॅलिटेक्निकल व सैनिक संकुल अशी दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. या सेंटरमधील सर्व खर्चाची जबाबदारी महापालिकेवर आहे.
चौकट
कोट
जिल्हा प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधी मिळाला आहे. त्यात आता अँटीजेन कीट व लसीकरणाचे डोस शासनाकडून पुरविले जात आहेत. त्यामुळे हा मोठा खर्च कमी झाला आहे. महापालिकेला १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याज कोरोनासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना उपाययोजनांच्या खर्चाचा ताण तिजोरीवर पडलेला नाही. आताही त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका.
चौकट
कोरोना उपाय योजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला किती निधी मिळतो?
२.९० कोटी
चौकट
जिल्ह्यातील एकूण रुग्ण : ५२७८०
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : २५७०
शहरात उपचार सुरू असलेले रुग्ण : ४००