कोरोनाची लस आली, आरोग्य कर्मचारी पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:11+5:302021-01-22T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची लस येईपर्यंत प्रचंड उत्सुकता होती. पण, ती आल्यानंतर आरोग्य कर्मचारी लांबच पळत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची लस येईपर्यंत प्रचंड उत्सुकता होती. पण, ती आल्यानंतर आरोग्य कर्मचारी लांबच पळत आहेत. शनिवारी लसीकरण सुरू झाले, त्यानंतर बुधवारपर्यंत एक हजारजणांचेही लसीकरण पूर्ण झालेले नव्हते.
सरकारी व खासगी क्षेत्रातील २५ हजारांहून अधिक डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविन पोर्टलवर नोंदणी केली आहे. शनिवारी व मंगळवारी पोर्टल अत्यंत मंद गतीने काम करत होते. शनिवारी ४५६ आणि मंगळवारी फक्त ४३२ जणांचे लसीकरण होऊ शकले. गुरुवारीही तशीच अवस्था राहिली.
लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा प्रतिसादही अत्यंत निरुत्साही आहे. अधिकाधिक लसीकरणासाठी वरिष्ठ पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी स्वत: आढावा घेत आहेत.
विशेषत: शासकीय रुग्णालये व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. मिरज, सांगली सिव्हीलमध्ये डॉक्टरांचे लसीकरण चांगले असले तरी परिचारिका, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी पुढे येईनास झालेत. एमबीबीएसचे विद्यार्थी, इंटर्नशीपचे डॉक्टर्स यांनीही लसीकडे पाठ फिरविली आहे.
चौकट
महापालिका कर्मचाऱ्यांचीही पाठ
लसीकरणासाठी प्रशासनाला महापालिकेकडेही पाठपुरावा करावा लागत आहे. तेथील आरोग्य विभागात लसीकरणासाठी सुसुत्रता नसल्याचे आढळले आहे. आरोग्य कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील खासगी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुढे सरकेना झाले आहे.
चौकट
भारती रुग्णालयाचे काम चांगले
भारती रुग्णालयात लसीकरणाचे काम पहिल्या दिवसापासूनच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य आठ केंद्रांवर दररोज ५० टक्केदेखील लसीकरण शक्य झालेले नाही, भारतीमध्ये मात्र ६५ टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे. मंगळवारी व गुरुवारीदेखील ७० टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले.
कोट
गेल्या दोन दिवसांत कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. नेहमीच्या लसीप्रमाणे थोडासा ताप किंवा अंगदुखी इतकाच नगण्य त्रास जाणवतो. अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी लस टोचून घेतली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी बिनधास्त पुढे यावे.
- डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी
---------------
-----------