पंढरीची वारी झाल्यास जगातील कोरोना नामशेष होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:12+5:302021-07-01T04:20:12+5:30
सांगली : सध्या देशातच नव्हे तर जगभरात कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देश कोरोनामुक्त होण्यासाठी संतांच्या परंपरा जपल्याने ...
सांगली : सध्या देशातच नव्हे तर जगभरात कोरोनामुळे संकट निर्माण झाले आहे. संपूर्ण देश कोरोनामुक्त होण्यासाठी संतांच्या परंपरा जपल्याने आपल्या जगावर आलेली विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळेच पायी वारी झाल्यास केवळ देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी बुधवारी सांगलीत केले.
पंढरपूरच्या पायी वारीला परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन भिडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
भिडे म्हणाले, आपला संपूर्ण देश कोरोनामुक्त व्हावा असेच प्रत्येकाला वाटत आहे आणि लवकरच देश कोरोनामुक्त होणारही आहे. त्यामुळे वारीला परवानगी दिल्यास संत परंपरा जपली जाणार आहे. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वाऱ्या करणारे लाखो वारकरी आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडित झाली असतानाही वारकरी उत्सुक आहेत. राज्यात सर्वत्र राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, शिवाय काही जिल्हे वगळता कोरोनास्थितीही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करत वारकऱ्यांना वारीसाठी परवानगी द्यावी. शासनाने सुरुवातीला पायी वारीस परवानगी दिली होती. मात्र, नंतर केवळ बसने जाण्यास परवानगी दिली. हा वारकऱ्यांचा झालेला विश्वासघात असून, बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारून पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे पालन करून वारीसाठी परवानगी देण्यात यावी.
यावेळी वारकरी संप्रदायाचे लक्ष्मण नवलाई, बाळासाहेब काकडे, विश्वासराव गवळी, हणमंत पवार, अंकुश जाधव, संताजी काळे, राहुल बोळाज, सचिन पवार, अनिल तानवडे आदी उपस्थित होते.