कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:31+5:302021-05-16T04:24:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या लसीकरणाकडे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जात आहे. लसीकरण पूर्ण झाले तर ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या लसीकरणाकडे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जात आहे. लसीकरण पूर्ण झाले तर कोरोनाचा धोका कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा धोका कमी झाला तरच गेल्या वर्षभर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत. आता शाळा कधी सुरू होणार ते कोरोना लसीकरणच ठरविणार असल्याचा सूर पालक व शिक्षकांमध्ये उमटत आहे. शाळा नाही, लॉकडाऊनमुळे खेळता येत नसल्यामुळे विद्यार्थीही खूपच कंटाळले आहेत.
सध्या तरी केवळ १८ आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे. या वयोगटातील लसीकरणही २५ टक्केच झाले आहे. लहान मुलांसाठी अजूनही लस बाजारात आलेली नाही. त्यासोबतच तिसऱ्या लाटेची शक्यता असून, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थिती लहान मुलांचे लसीकरण प्राधान्याने करावे, असे पालकांचे मत आहे. तसेच लसीकरण झाले तरच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकणार असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. कोरोना परिस्थिती पाहूनच नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होणार किंवा नाही याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट
जिल्ह्यातील ३९५२६ हजार विद्यार्थी थेट दुसरीत
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील पहिली ते अकारावी यापैकी एकाही वर्गाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे पहिलीतील सर्व विद्यार्थी थेट दुसरीत दाखल झाले आहेत.
- पहिलीतील ३९ हजार ५२६ विद्यार्थी थेट दुसरीत दाखल झाले आहेत.
- शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा होत नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांचे निकाल तयार केले जातात; परंतु यावर्षी शाळाच सुरू झाल्या नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी वर्गोन्नत करण्यात आले आहेत.
चौकट
शिक्षणाधिकारी म्हणतात परिस्थितीनुसार निर्णय
गेल्यावर्षी शाळा भरली नाही. जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे. यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणेच शाळांसदर्भात शासनाच्या आदेश आणि परिस्थितीनुसारच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी सांगितले.
चौकट
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक
कोट
दीड वर्षात एकही दिवस शाळेत जाता आले नाही. आता लसीकरण सुरू झाल्यामुळे शाळा सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मित्र शाळेत एकत्र येऊन मौज मस्तीसोबतच अभ्यास करणे सोपे होणार आहे. त्यासाठी लवकर लसीकरण पूर्ण होऊन शाळा सुरू होणे आश्यक आहे.
- किरण सावंत, विद्यार्थी
कोट
सध्या लसीकरण सुरू असले तरी अजूनही सर्व शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्याचप्रमाणे १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी अद्याप लस आलेली नाही. अशा स्थितीत प्रत्यक्ष शाळा कशी सुरू होणार याविषयी साशंकता आहे. मात्र, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गातच शिकविलेले अधिक समजते. त्यामुळे लहान मुलांचेही लसीकरण लवकरात लवकर करून शाळा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
-सतीश पाटील, शिक्षक
कोट
कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यातच मोठ्यांचे लसीकरणही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण केव्हा होणार आणि शाळा कधी सुरू होणार याविषयी स्पष्टता नाही. मात्र, मुलांना अशा प्रकारे अधिक दिवस शाळेपासून दूर ठेवता येणार नाही. शासनाने लवकर उपाययोजना करावी.
-स्वाती पाटील, पालक
चौकट
ऑनलाइन आणि ऑफलाइन
- गेल्या वर्षी शहरातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणच दिले गेले. हाच पर्याय यावर्षीही शिक्षण विभागासमोर असणार आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यास ऑनलाइनसोबतच ऑफलाइन शिक्षणाचाही विचार करता येईल.
-ग्रामीण भागात काही ठिकाणी ऑफलाइन शिक्षण दिले गेले. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका वाढल्याने ग्रामीण भागातही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायांचा शिक्षण विभागाला विचार करावा लागणार आहे.