कोरोना काळात रद्दीतून होणार गरजूंना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:24+5:302021-05-29T04:20:24+5:30
विटा : कोरोना संकटकाळात असंख्य लोकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मदत करणाऱ्यांचे हातही खूप असले तरी, या संकटात मदत ...
विटा : कोरोना संकटकाळात असंख्य लोकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मदत करणाऱ्यांचे हातही खूप असले तरी, या संकटात मदत तोकडी पडत आहे. काही कारणांमुळे ''जे'' इच्छा असूनही मदत करू शकत नाहीत, अशा व्यक्तींसाठी आता ''रद्दीतून मदतीची संधी'' हा उपक्रम विटा येथील देशप्रेमी मंचच्यावतीने राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या घरातील रद्दी किंवा जुनी पुस्तके देऊन गोरगरिबांच्या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देशप्रेमी मंचचे अध्यक्ष सिकंदर ढालाईत यांनी केले.
सिकंदर ढालाईत म्हणाले, "घरा-घरात रद्दी असते. तिचे संकलन करून ती विकून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात देण्यामध्ये अनेकांचा हात लागू शकतो व सर्व स्तरातल्या आणि प्रत्येक क्षेत्रातल्या महिला, पुरुष व मुलांनाही लॉकडाऊनच्या काळात ''आपणही सहकार्य करू शकलो'' याचे समाधान मिळू शकते. आपण आपल्याकडील रद्दी साफ करून, व्यवस्थित बांधून आमच्याकडे पोहोच करावी. जास्त रद्दी असल्यास फोन करून पत्ता सांगितल्यास आम्ही येऊन ती संकलित करू. आपल्या रद्दीच्या विक्रीतून आलेली रक्कम गरजूंच्या मदतीसाठी वापरली जाईल.
संस्थापक गजानन बाबर म्हणाले, गरीब, होतकरू मुलांना नवीन शालेय पुस्तके घेणे शक्य नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तके डागडुजी करून गरजू मुलांपर्यंत आम्ही ती पोहोचवणार आहोत. त्यामुळे आपण गरजू कुटुंबातील होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावू शकता. तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तींचा वेळ सत्कारणी लागावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, मनोरंजन व्हावे, यासाठी त्यांना वाचण्याकरिता पुस्तके पुरवण्याचे काम देशप्रेमी मंच करणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे वाचून झालेली व वाचनासाठी उपयुक्त पुस्तके आहेत, ती आपण दान करून आमच्याकडे सुपूर्त करावीत.