corona virus - इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय महिलेला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 06:38 PM2020-04-06T18:38:16+5:302020-04-06T18:42:28+5:30
इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
इस्लामपूर/सांगली : इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
इस्लामपूर शहरात गेल्या चौदा दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झालेले चार रुग्ण सापडल्यानंतर अवघे शहर भीतीच्या छायेखाली गेले होते. त्यानंतर ही संख्या 22 पर्यंत गेल्याने सगळीकडे स्मशानशांतता पसरली होती; मात्र आरोग्य विभागाच्या जिगरबाज कामगिरीने या कोरोना संसर्गाचा पाडाव होण्यास सुरुवात झाल्याने शहरात आशावादी वातावरण निर्माण झाले होते.
बंदिस्त करण्यात आलेल्या परिसरात १६०८ घरे असून, त्यातील ७६३१ व्यक्तींची दैनंदिन तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवक, सेविका आणि आशा वर्कर यांची ३१ पथके अविरतपणे काम करत होती. तर होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या घर भेटीसाठी १६ पथके कार्यरत होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील म्हणाले, तालुक्यात एकूण १०८ जण परदेशवारी करून आलेले नागरिक होते. या सर्वांचे अलगीकरण करण्यात आले होते. अद्याप २० जण अलगीकरणात आहेत.
प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंग देशमुख यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका आरोग्य विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, आशा वर्कर कोरोना संसर्गाची बाधा रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.