कोरोनाने मृत्यूंमध्ये ७५ टक्के रुग्णांना पूर्वीपासूनच आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:46+5:302021-06-18T04:19:46+5:30
सांगली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. अद्याप रुग्णसंख्या हजारावर स्थिर असलेतरी ...
सांगली : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्याही स्थिर होत आहे. अद्याप रुग्णसंख्या हजारावर स्थिर असलेतरी ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटी रेटही कमी हाेत असल्याने दिलासा मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अगोदरच आजार असलेले रुग्णांचेच मृत्यूचे प्रमाण अधिक असून, त्यात ४० ते ७० वयोगटातील व्यक्तींचे सर्वाधिक प्रमाण आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जानेवारीपासून नवीन आकडेवारीस सुरुवात झाली आहे. याच कालावधीत रुग्णसंख्या वाढत चालल्याने दुसरी लाट गृहीत धरली जाते त्यात सहव्याधी असलेले रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातही अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेल्या बाधितांचे प्रमाण अधिक होते.
सहा महिन्यांतील मृत्यूमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. लवकर उपचार न घेता घरातच थांबून राहिल्यानेही अनेकांचे मृत्यू ओढवले आहेत. दुसऱ्या लाटेत गुरुवारअखेर एकूण २०६३ जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात चाळीस वर्षांपासून पुढील व्यक्तींच्याच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार दर महिन्याला डेथ ऑडिट केले जाते. त्यात मृत्यूची संख्या, मृत्यूचेे नेमके कारण, त्यातील कोणत्या आजाराने अगोदरच व्यक्ती बाधित होती याचीही आकडेवारी केली जाते. त्यामुळे सहव्याधी असलेले व्यक्तींच्याच मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट
उपचारास विलंबाने ओढवले मृत्यू
कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच यावेळीही लवकर निदान व त्यानंतर तातडीने उपचार घेण्यास झालेली हयगय अनेकांच्या जीवावर बेतली आहे. लवकर निदान झाले असते तर उपचार सुरू करण्यास अडचणी नव्हत्या. मात्र, अनेकांनी स्थानिक डॉक्टरांनाच दाखवून घरातच थांबण्यास प्राधान्य दिले व प्रकृती अधिकच बिघडल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू केल्याने मृत्यूचे प्रमाण आहे.
चौकट
सर्वात जास्त मधुमेहीच
* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बळी गेलेल्या रुग्णांमध्ये ६० टक्के जणांना अगोदरच मधुमेहासह इतर आजारांचे निदान झाले होते.
* यातही मधुमेही रुग्णांचेच प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मधुमेहाची औषधे व इन्सुलीन घेणाऱ्यांचे प्रमाण होते.
* मधुमेहानंतर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण होते. त्यांचेही प्रमाण अधिक प्रमाणात असल्याचे ऑडिटमधून समोर आले.
चौकट
‘मला काय होतंय’मुळे अनेकजण मृत्यूच्या दारात
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तुलनेने तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यात कोरोनाची लक्षणे असतानाही हा साधा ताप असल्याचे व मला कोराेना होणारच नाही या मानसिकतेमधील वयाने तरुण रुग्णांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यातील अनेकांचे मृत्यू ओढवले.
चौकट
बेडसाठी वणवण नाही
गेल्यावर्षी जिल्ह्यात उपचारासाठी बेड मिळविताना रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत होती. दुसऱ्या लाटेत मात्र, रुग्णांची संख्या २३०० वर गेली असतानाही रुग्णांना ऑक्सिजन व नियमित बेड्स मिळत होते. आता अनेक रुग्णालयातील बेड रिकामे पडले आहेत.
चौकट
वयोगटानुसार मृत्यू
० ते ९ ०
१० ते १९ १
२० ते २९ ३३
३० ते ३९ १४०
४० ते ४९ २५२
५० ते ५९ ४१४
६० ते ६९ ५७८
७० ते ७९ ४४२
८० ते ८९ १८२
९० आणि पुढील २१