कोरोनामुळे रेशनिंगच्या धान्याची घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:43+5:302021-05-06T04:28:43+5:30

विटा : कोरोना महामारीच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील ...

Coronary home delivery service of rationing grains | कोरोनामुळे रेशनिंगच्या धान्याची घरपोच सेवा

कोरोनामुळे रेशनिंगच्या धान्याची घरपोच सेवा

Next

विटा : कोरोना महामारीच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये यासाठी मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ सरपंच विजय मोहिते, ग्रामदक्षता समितीचे सदस्य सुभाष मोहिते, ग्रामसेवक पी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरत आहे. अशा परिस्थितीत मोहित्यांचे वडगाव गावाने सध्या कोरोनाला वेशीबाहेरच थोपविण्यात यश मिळविले आहे.

तरीही कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात लाभार्थी ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी ग्रामदक्षता समितीने रेशनिंगचे धान्य लाभार्थींना थेट घरात पोहच करण्याचा उपक्रम राबविला आहे. येथील सर्व सेवा सोसायटीच्या मालकीचे असलेल्या स्वस्त धान्य दुकानात आलेले गहू, तांदूळ धान्य टेम्पोत भरून हा टेम्पो थेट ग्राहकांच्या दारात जात आहे.

त्याठिकाणी ग्राहकांना नियमाप्रमाणे मिळणारे धान्य वितरण केले जात आहे. गावातील प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या दिवशी धान्यवाटप केले जात आहे. दररोज सकाळी ध्वनिक्षेपकांवरून कोणत्या प्रभागात धान्याचे वाटप होणार आहे, याची माहिती सरपंच विजय मोहिते देत आहेत. त्यानुसार कोरोनाच्या काळात कोणतीही गर्दी न करता लाभार्थी ग्राहकांना रेशनिंगचे धान्य थेट त्यांच्या घरात पोहच होत आहे. या उपक्रमाच्या आरंभवेळी ग्रामसेवक पी. बी. पाटील, सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव मोहिते, धान्य दुकानदार सुनील मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे जोपर्यंत कोरोना संसर्ग आहे, तोपर्यंत लाभार्थी ग्राहकांना घरपोच धान्य वितरण केले जाणार असल्याचे सरपंच विजय मोहिते यांनी सांगितले.

फोटो : ०५०५२०२१-विटा-धान्यवाटप

ओळ : मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रेशनिंग दुकानात गर्दी होऊ नये याची दक्षता घेत रेशनिंगचे धान्य लाभार्थी ग्राहकांना थेट त्यांच्या घरी जाऊन वाटप केले जात आहे.

Web Title: Coronary home delivery service of rationing grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.