कोरोनाचा कोप, अंत्यसंस्कारावर महापालिकेचे ८६ लाख रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:59+5:302021-06-09T04:32:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोविडने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने खांद्यावर घेतली आहे. आतापर्यंत २,६०० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोविडने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने खांद्यावर घेतली आहे. आतापर्यंत २,६०० मृतदेहांवर पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यापोटी महापालिकेला ८६ लाख रुपयांचा खर्च आला आहे तर जिल्हा प्रशासनाकडे ग्रामीण भागातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा ३० ते ३५ लाखांचा निधी प्रलंबित आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविडने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेत मिरजेतील पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. या काळात मृत व्यक्तीचे नातेवाईकही जवळ येण्यास तयार नव्हते. अशावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या नात्यापलिकडे जाऊन अंत्यसंस्कार केले. पहिल्या लाटेत १,६६४ (३१ मार्च २०२१अखेरपर्यंत) मृतांवर महापालिकेने अंत्यसंस्कार केले. यात शहरासह जिल्ह्याचा ग्रामीण भाग, परजिल्हे व कर्नाटकातील व्यक्तींचा समावेश आहे तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ९८४ मृतांवर अंत्यविधी करण्यात आला आहे.
स्मशानभूमीत नियुक्त केलेल्या स्वच्छता निरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी खासगी ठेका दिला. सप्टेंबर महिन्यापासून खासगी ठेकेदारामार्फत अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत. एका अंत्यसंस्कारासाठी सर्वसाधारण साडेचार ते पाच हजार रुपयांचा खर्च येत आहे.
चौकट
अंत्यसंस्कारासाठी साडेचार हजार खर्च
१. महापालिकेच्यावतीने मिरज-पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत कोविडने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.
२. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सप्टेंबर ते मार्चपर्यंत ठेकेदाराला २ हजार रुपये दिले जात आहेत.
३. अंत्यसंस्कारासाठी तीनशे ते चारशे किलो लाकूड, पाच लीटर डिझेल, कापड आदी साहित्य महापालिकेकडून पुरवले जाते. यासाठी सर्वसाधारणपणे अडीच हजार रुपये खर्च येत आहे. तर एकूण अंत्यसंस्कारासाठी साडेचार हजार रुपये खर्च होत आहे.
चौकट
पालिका कर्मचारी, ठेकेदारावर जबाबदारी
१. महापालिकेने कोविड मृत व्यक्तींवर अंत्यसंस्काराची जबाबदारी खासगी ठेकेदारावर सोपवली आहे.
२. तत्पूर्वी महापालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार करत होते. एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली.
३. ठेकेदारावर नियंत्रणासाठी महापालिकेकडून स्वच्छता निरीक्षकासह कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.
४. दररोज २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
चौकट
शासनाकडे लाखो रुपये येणे बाकी
महापालिकेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड मृतांवरही अंत्यसंस्कार केले आहेत. त्यापोटी आतापर्यंत ९ लाखांचा निधी मिळाला आहे. पालिकेचा ७४५ अंत्यसंस्कारांचा निधी अजून प्रलंबित आहे.
चौकट
कोट
कोरोनाच्या संकटात मृत व्यक्तींवर अंत्यसंस्काराचा प्रश्न बिकट झाला होता. पहिल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करताना पालिकेचे कर्मचारीही भयभीत होते. पण त्यांना मानसिक आधार दिला. त्यातून ही जबाबदारी माणुसकीच्या नात्याने पालिकेने हाती घेतली. - नितीन कापडणीस, आयुक्त
कोट
महापालिकेकडून आतापर्यंत अडीच हजारहून अधिक मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी येणारा खर्च स्वनिधीतून केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून निधी मिळत आहे. पालिकेच्या ठेकेदारांकडून साहित्य पुरवठा केला जातो तर खासगी ठेकेदार अंत्यसंस्काराचे सोपस्कर पूर्ण करत आहेत. - स्मृती पाटील, उपायुक्त, मिरज
चौकट
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित : १,२३,६४९
बरे झालेले : १,१०,५७८
सध्या उपचार घेत असलेले : ९,५०४
एकूण मृत्यू : ३,५६७
सध्याचा पाॅझिटिव्हिटी रेट : ९.३५ टक्के