महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:25+5:302021-04-12T04:25:25+5:30

पलूस : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवर या वर्षीही कोरोनाचे सावट दिसते आहे. यामुळे अनेक पैलवानांचे भविष्य अंधारात आले आहे. गेल्या ...

Corona's defeat at the Maharashtra Kesari competition | महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर कोरोनाचे सावट

महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर कोरोनाचे सावट

Next

पलूस : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेवर या वर्षीही कोरोनाचे सावट दिसते आहे. यामुळे अनेक पैलवानांचे भविष्य अंधारात आले आहे. गेल्या वर्षीही निवड चाचणी होऊनसुद्धा ही स्पर्धा घेतली नाही. त्यामुळे पैलवानांमध्ये नाराजी आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून मॅटवर खेळणारे १० आणि माती मैदानात खेळणारे १० अशा २० मल्लांची निवड होत असते. त्यासाठी निवड चाचण्या प्रत्येक जिल्ह्यात होतात. गतवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. यंदाही स्पर्धेवर कोरोनाचे सावट असले तरी या स्पर्धा इतर खेळांप्रमाणे ऑनलाईन घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सर्व वजनी गटांतून महाराष्ट्र केसरी निवड चाचणीला फक्त सांगली जिल्ह्यातून सीनिअर गटातून ३०० आणि इतर ६०० असे ९०० मल्ल तयारी करीत आहेत. या मल्लांचे भवितव्य या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर अवलंबून आहे.

वर्षभर सराव केलेला असतो, खुरकावर लाखो रुपये खर्च केले होतात. अशा परिस्थितीत गावोगावी भरणारी मैदानेही पूर्णपणे बंद असल्याने पैलवानांपुढे आर्थिक समस्या उभा राहिल्या आहेत. अनेक पैलवान सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या खुराकावरील खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ज्या पद्धतीने या कठोर काळात इतर घटकांना शासनाने मदत केली, तशी या मल्लांनाही मदत करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने कुस्तीगीर परिषदेची मदत घेऊन जे खरोखर खेळ दाखवतात, त्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

कोट

कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे, इतर स्पर्धा ऑनलाइन होतात तर मग कुस्ती का घेत नाहीत? शासनाने ऑनलाइन महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेणे आवश्यक आहे.

- काकासाहेब पवार, आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल प्रशिक्षक.

कोट

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पथदर्शक म्हणून पाहावे, ही सुरुवात समजून यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लांनी प्रयत्न केले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. पैलवानांचे मानधनही वाढवणे आवश्यक आहे.

- राहुल आवारे, राष्ट्रकुल पुरस्कार प्राप्त पैलवान

कोट

कुस्तीला लोकाश्रय आहे. कोरोनाचे बंधन फक्त कुस्तीलाच का? महाराष्ट्र केसरीसाठी अनेक मल्लांनी तयारी केली आहे. जर या स्पर्धा झाल्या नाहीत तर त्यांचे खच्चीकरण होईल.

- राम सारंग, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक

Web Title: Corona's defeat at the Maharashtra Kesari competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.