कोरोनाच्या डेल्टा प्लसचे सावट, नवा अवतार धडकी भरवणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:38+5:302021-06-25T04:19:38+5:30
लोकमत न्यूूज नेटवर्क सांगली : कोरोनातून बाहेर पडेपर्यंत जीव कासावीस झाल्यानंतर आता डेल्टा प्लसला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे लागणार ...
लोकमत न्यूूज नेटवर्क
सांगली : कोरोनातून बाहेर पडेपर्यंत जीव कासावीस झाल्यानंतर आता डेल्टा प्लसला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. कोरोनाचा हा नवा अवतार ध़डकी भरवणारा आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अद्याप नियंत्रणात आलेला नाही. पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी असला तरी दररोज सरासरी ८०० ते ९०० नवे रुग्ण आढळत आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्याही २६९वर गेली असून, मृतांचा आकडा सोळावर पोहोचला आहे. कोरोनाचे संकट संपत नसल्याने जिल्हा कासावीस झाला आहे. या स्थितीत डेल्टा प्लस विषाणूच्या फैलावाची टांगती तलवार धडकी भरवत आहे.
या विषाणूचा एकही रुग्ण जिल्ह्यात अद्याप सापडलेला नसली तरी धोक्याची घंटा कायम आहे. कोरोनाचा वेगाने झालेला फैलाव पाहता मुंबई - पुण्यातून तो सांगलीला पोहोचायला वेळ लागणार नाही, हे निश्चित आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला हाच धोका सतावतो आहे. कोरोनाच्या नमुन्यांपैकी पाच टक्के नमुने पुण्याला पाठवून नियमित चाचणी केली जात आहे.
बॉक्स
जिल्ह्यात दररोज १० हजार चाचण्या
१. जिल्ह्यात दररोज सरासरी १० हजार कोरोना चाचण्या सुरू आहेत. आरटीपीसीआर २ हजार ५०० आणि रॅॅपिड अँटिजनच्या ७ हजार ५०० चाचण्या केल्या जात आहेत.
२. आरटीपीसीआर चाचण्यांमधून सरासरी १० ते १५ टक्के बाधित आढळत आहेत, तर रॅपिड अँटिजनमधून १० टक्के नवे रुग्ण निष्पन्न होत आहेत.
३. बुधवारचा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ९.३३ टक्के इतका राहिला. त्यामुळे सांगलीकरांच्या डोक्यावरील धोक्याचे संकट टळलेले नाही हे स्पष्ट झाले.
आरोग्य विभागाची पूर्ण खबरदारी
१. डेल्टा प्लस या नव्या विषाणूच्या संकटाकडे जिल्ह्याचा आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवून आहे. नव्या रुग्णाच्या चाचणीच्या अहवालांची काटेकोर छाननी केली जात आहे.
२. डेल्टा विषाणूचा जिल्ह्यात प्रवेश होण्यापूर्वीच कोरोनाचा नि:पात करण्यासाठी खटपट सुरू आहे. त्यासाठी चाचण्यांचे प्रमाण दररोज १० हजारपर्यंत नेले आहे.
३. लसीकरणदेखील वेगाने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीचा पुरवठा होताच त्वरित लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला अधिकाधिक लस मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
४. स्वॅबच्या ५ टक्के नमुन्यांची फेरतपासणी डेल्टाच्या अनुषंगाने केली जात आहे. एकूण नमुन्यांपैकी ५ टक्के नमुने पुणे, मुंबईला तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
ग्राफ
कोरोनाचे एकूण रुग्ण १,३८,८३७
बरे झालेले रुग्ण १,२६,५४१
उपचार घेत असलेले रुग्ण ८,३४८
बळी ३,९४८
गृहविलगीकरण ६,७९४