मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाच्या भीतीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:36+5:302021-03-25T04:25:36+5:30
वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत वैद्यकीय व्यवसायाची दीडशे वर्षांची परंपरा आहे. मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरात उपलब्ध ...
वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत वैद्यकीय व्यवसायाची दीडशे वर्षांची परंपरा आहे. मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरात उपलब्ध असलेले अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळत असल्याने मिरजेत जिल्ह्यासह शेजारील कर्नाटकातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न फार्मसी, प्रयोग शाळा, रेडिओलॉजी तंत्रज्ञ, भाैतिकोपचार यासह अनेकांचे रोजगार वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहेत.
मिरजेतील विविध रुग्णालयांत प्लास्टिक सर्जरी, शल्यचिकित्सा, अवयवरोपण, पेशीरोपण, हृदयरोग, अस्थिव्यंग, कर्करोग उपचार, सांधेरोपण, रेडिएशन, एन्जिओप्लास्टी, बोनमॅरो याच्यासह विविध शस्त्रक्रिया व उपचारांची सोय असल्याने खासगी रुग्णालयात रुग्णांची दररोज मोठी गर्दी असते. गतवर्षी कोरोना साथीचा वैद्यकीय क्षेत्राला फटका बसला होता. रुग्ण नसल्याने एप्रिलपासून नाॅन कोविड रुग्णालये बंद होती. रुग्णसेवा करणाऱ्या डाॅक्टरांना कोरोना संसर्गाला तोंड द्यावे लागले. कोरोना रुग्ण सापडलेल्या अनेक खासगी रुग्णालयांना महिनाभर सील ठोकण्यात आले. गेल्या काही महिन्यांत वैद्यकीय क्षेत्र पूर्वपदावर आल्यानंतर रुग्णालये पुन्हा गजबजली होती. मात्र मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने भीतीने रुग्णांची संख्या कमी होऊन वैद्यकीय क्षेत्रातील आर्थिक उलाढाल घटली आहे. उपचार खर्च कमी असल्याने मिरजेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. वैद्यकीय क्षेत्रामुळे मिरजेत अनेकांना रोजगार मिळाला आहे. मिरजेतील खासगी रुग्णालयात दररोज कोट्यवधीची उलाढाल होते. वैद्यकीय उपचाराशी संलग्न वैद्यकीय प्रयोगशाळा, औषध विक्री, नर्सिग, रुग्णालय कर्मचारी, रुग्णवाहिका, जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आदी विविध घटकांचा रोजगार यावर अवलंबून आहे.
मिरजेत मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून रुग्ण येतात. मात्र कर्नाटक प्रवेशासाठी निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होऊन खासगी हाॅस्पिटलचालक यावर्षीही पुन्हा अडचणीत आले आहेत.