वेशीवर रोखणाऱ्या सिद्धेवाडी गावास कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:36+5:302021-05-25T04:30:36+5:30
मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे कोरोना वेशीवर रोखणाऱ्या गावास ग्रामस्थांच्या बेजबाबदार वागण्याने विळखा पडला आहे. ...
मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे कोरोना वेशीवर रोखणाऱ्या गावास ग्रामस्थांच्या बेजबाबदार वागण्याने विळखा पडला आहे. वेळेत उपचार न घेणे, कोरोनाबाधित असताना मोकाट फिरणे, माहिती लपविणे या कारणांनी धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने कोरोना चाचणीची सक्तीची मोहीम उघडली आहे.
सिद्धेवाडी येथे कोरोना वेशीवर रोखणारे ग्रामस्थ बेजबाबदार वागत असल्याने कोरोनाचे प्रमाण वाढीस लागले आहे. बाहेरून येणाऱ्या नातेवाइकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संसर्ग झालेले माहिती लपवून उपचाराकडे दुर्लक्षित करीत असल्याने कोरोनाचा गावात प्रसार वाढू लागला आहे. आशा स्वयंसेविका गाव पिंजून काढून रुग्णांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांच्या सूचनांनाही न जुमानता हुज्जत घालण्याचेही प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. आजार अंगावर काढला जात असल्याने काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना वाढीस लागल्याची दखल घेत दक्षता समितीचे सरपंच रामचंद्र वाघमोडे, उपसरपंच सागर माने, अशोक गरंडे, महावीर खोत, दादासो धडस व ग्रामसेवक विनायक मोरे यांनी कोरोना रोखण्यासाठी सक्तीची कोरोना चाचणीची मोहीम हाती घेतली आहे. कडक उपाय म्हणून मास्क न वापरणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. भोसे प्राथमिक केंद्राच्या पथकाने आशा स्वयंसेविका सरोज शितोळे, संपदा शिनगारे, राणी गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा एडके, प्रकाश नाईक या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपासणी मोहीम सुरू आहे.
चौकट
कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घालणार
वेळेत तपासणी व उपचार न घेणे, बाधित असताना मोकाट फिरणे, बाहेरून आलेल्या बाधित रुग्णांची माहिती लपविली जात असल्याने रुग्णसंख्या वाढीचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायत व दक्षता समितीने दक्षता म्हणून सक्तीची तपासणी व दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गावात औषध फवारणी केली जात आहे. आणखी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सरपंच रामचंद्र वाघमोडे, ग्रामसेवक विनायक मोरे यांनी दिली.