मिरजेतून आघाडीला सुरुंग

By admin | Published: April 29, 2017 12:06 AM2017-04-29T00:06:51+5:302017-04-29T00:06:51+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध रणनीती : प्रभाग सभापती निवडीनिमित्त संघर्ष

Coronation | मिरजेतून आघाडीला सुरुंग

मिरजेतून आघाडीला सुरुंग

Next



सांगली : महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग समिती सभापती निवडीत आघाडी केली खरी, पण ही आघाडी मिरजकरांच्या पचनी पडलेली नाही. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आघाडीच्या राजकारणाला सुरूंग लावत सवतासुभा मांडला आहे. त्याचा प्रयत्य सभापती निवडीच्या निमित्ताने येत असून शनिवारी होणाऱ्या निवडीवेळी प्रभाग चारचे सभापतीपद कोणाकडे जाणार? याचीच उत्सुकता लागली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहराची महापालिका झाली तरी मिरजकरांनी नेहमीच आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. मिरजेतील प्रभाग चारमध्ये महापालिकेच्या स्थापनेपासून इद्रिस नायकवडी गटाचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला अनेकदा आव्हानही दिले गेले. पण अल्पमतात असतानाही नायकवडी यांनी विरोधकांवर मात केली होती.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होत असल्याने यंदा प्रभाग सभापती निवडीलाही महत्व प्राप्त झाले आहे. गतवर्षी सभापतीसाठी घरातून बोलावून उमेदवारी देण्यात आली. यंदा मात्र चारही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यात सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमीलन झाल्याने या निवडी बिनविरोध होतील, असा अंदाजही होता.
सांगलीतील प्रभाग एकमध्ये पांडुरंग भिसे व वंदना कदम या दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली तर त्याबदल्यात प्रभाग दोनमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला हात दिला. या प्रभागात राष्ट्रवादीच्या अंजना कुंडले व स्वाभिमानीच्या अश्विनी खंडागळे यांचे अर्ज आहेत. स्वाभिमानीचे संख्याबळ कमी असल्याने कुंडले यांचा विजय निश्चित आहे. प्रभाग समिती तीन काँग्रेसला सोडण्यात आली असली तरी राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या गुलजार पेंढारी व राष्ट्रवादीच्या स्नेहा औंधकर यांचे अर्ज आहेत. औंधकर या माजी सभापती आहेत. या तीन प्रभागाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फारशी चिंता नाही.
पण मिरजेतील प्रभाग चारमध्ये मात्र मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या प्रभागावर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी कागदोपत्रीच आहे. इद्रिस नायकवडी गटाचाच उमेदवार आजअखेर सभापती झाला आहे. यापूर्वी या गटाच्या मालन हुलवान, हसिना नायकवडी यांनी सभापती पदाची सूत्रे सांभाळली आहेत. आता आघाडीच्या राजकारणात या प्रभागात काँग्रेसने अश्विनी कांबळे यांना उमेदवारी दिली. पण त्याची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याचे सांगत नायकवडी गटातून शुभांगी देवमाने व शिवाजी दुर्वे यांनी अर्ज दाखल केले आहेत. पक्षीय संख्याबळाला या प्रभागात फारसे महत्व नाही.
आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी आघाडीलाच सुरूंग लावला आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराऐवजी इतर उमेदवारांसाठी जुळवाजुळव गतिमान झाली आहे. मिरजेतील सर्वच नेते स्वयंभू असल्याने दोन ते तीन गट एकत्र येऊन राजकारणाची दिशा ठरवित असतात. हाच अनुभव आता प्रभाग सभापती निवडीच्या निमित्ताने येत आहे. या निवडीने आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
नायकवडी : संघर्ष समिती की भाजप?
माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी कधी मिरज संघर्ष समिती तर कधी राष्ट्रवादी, तर कधी विकास महाआघाडीतून महापालिकेत प्रवेश केला. आता काँग्रेसच्या चिन्हावर त्यांच्या घरातील तिघेजण नगरसेवक आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे नायकवडी व त्यांच्या पाठीमागे जाणारे नगरसेवक मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार, की भाजपमध्ये प्रवेश करणार, याची चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता कमी असली तरी राजकीय समझोता होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.