मल्लेवाडीतील कोरोनामुक्त वृद्ध महिलेस उपायुक्तांचा माणुसकीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:18 AM2021-06-11T04:18:47+5:302021-06-11T04:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत महापालिकेच्या कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या मल्लेवाडीतील वृद्ध महिलेस कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परत जाण्यासाठीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत महापालिकेच्या कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या मल्लेवाडीतील वृद्ध महिलेस कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परत जाण्यासाठीही पैसे नसल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांनी वृद्धेस आर्थिक मदत, एक महिन्याचे धान्य देऊन घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली.
मिरजेतील महापालिका कोविड सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांत हजारावर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मल्लेवाडी येथील ७० वर्षे वयाची वृद्ध महिला दहा दिवसांपूर्वी येथे उपचारासाठी दाखल झाली होती. उपचार पूर्ण झाल्यानंतर वृद्धेस घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र वारंवार नातेवाइकांशी संपर्क करूनही वृद्धेस नेण्यासाठी कोणीस येत नसल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांना याची माहिती देण्यात आली. उपायुक्त पाटील यांनी वृद्धेकडे चाैकशी केल्यानंतर त्यांच्या घरात मुलगा व सून असून, घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्धेचा मुलगा अपंग असल्याने सुनेशी संपर्क साधला. वृद्धेस कोरोना संसर्गामुळे आम्ही विलगीकरणात असल्याने मजुरी बंद आहे. यामुळे मिरजेला येण्यासाठीही पैसे नसल्याचे सुनेने सांगितले. वृद्धेच्या दुर्दैवी परिस्थितीमुळे उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यांच्याकडून वृद्धेस रोख मदत, एक महिन्याचे गहू पीठ, तांदूळ, तेल, डाळ असे साहित्य दिले. महापालिकेकडून संपूर्ण औषधाचे किट व ‘आयुष’ रुग्णवाहिकेतून त्या वृद्धेस मल्लेवाडीपर्यंत सोडण्यात आले. स्मृती पाटील यांच्यामुळे घरी जाण्याच्या प्रतीक्षेत असलेली गरिब वृद्धा घरापर्यंत पोहोचली.
चाैकट
खासगी रुग्णालयाने नाकारलेल्यांना महापालिका कोविड सेंटरमध्ये उपचार
मिरजेत इतर आजारांवर उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासणीत कोविड असल्याचे निष्पन्न झाल्यास खासगी रुग्णालयांतून पिटाळून लावण्यात येते. मिरजेतील एका खासगी रुग्णालयात पाॅझिटिव्ह आलेल्या परजिल्ह्यातील दोन गरीब रुग्णांना एका खासगी रुग्णालयातून पिटाळण्यात आले. कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने घाबरलेले हे रुग्ण शहरात फिरताना निदर्शनास आल्याने पोलिसांनी याबाबत महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित कोरोना रुग्णांना महापालिका कोविड केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.