coronavirus: बिलांबरोबर उपचार प्रक्रियेचेही ऑडिट गरजेचे - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 02:18 PM2020-09-20T14:18:52+5:302020-09-20T14:21:05+5:30
सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या पुढाकाराने पन्नास लाख रुपये खर्च करून ४० बेडचे अद्ययावत चोपडे मेमोरियल ट्रस्टकोविड रुग्णालय सुरू करण्यात आले.
सांगली - कोविड रुग्णालयांमधील बिलाच्या ऑडिटबरोबर रुग्णांवरील उपचार प्रक्रियेचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या पुढाकाराने पन्नास लाख रुपये खर्च करून ४० बेडचे अद्ययावत चोपडे मेमोरियल ट्रस्टकोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याचे लोकार्पण रविवारी जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, कोरोना रुग्णांवर उपचाराची भरमसाठ बिले येत असल्याने व त्याबद्दलच्या तक्रारी वाढत असल्याने अनेकठिकाणी वाद होत आहेत. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अंगावर लोक धावून जात आहेत. त्यामुळे बिलांच्या ऑडिटसाठी यंत्रणा उभी केली. बिलांप्रमाणेच आता कोरोना रुग्णांवर होणाºया उपचार प्रक्रियेचे ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालाय वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर असे चित्र असून चालणार नाही. रिमोटच्या सहाय्याने जर उपचार करायचे असतील तर त्या रुग्णालयांचा आणि त्याठिकाणच्या उपचाराचा काही उपयोग नाही.
रुग्ण असलेल्या ठिकाणी दररोज सकाळ व सायंकाळी डॉक्टरांनी सुरक्षा साधनांसह भेट दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांमार्फत वरकरणी तपासण्या करून बाहेरूनच डॉक्टर औषधोपचार करणार असतील तर त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. अशी रुग्णालये उभारूनही काही उपयोग होणार नाही. सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावेत. कोरोनाचे रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी का पडताहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहेत. काही डॉक्टर व कर्मचारी आवश्यक ते प्रयत्न करताहेत मात्र सर्वच ठिकाणी जर अपेक्षित उपचार प्रक्रिया राबविली तर मृत्यूदर कमी होऊ शकतो.
आम्हा नेत्यांना कडेवर घ्यायची सवय
जयंत पाटील म्हणाले, आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी दहा फुटांवरून सर्वांशी संवाद साधतात. ते नियम पाळत असतात, मात्र आमच्याकडील सर्व नेत्यांना अशी सवय नाही. प्रत्येकाला कडेवर घ्यायची सवय त्यांना आहे. या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला