CoronaVirus : सांगलीत भाजप-शिवसेना आमने-सामने, कोरोनावरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:52 PM2020-05-22T18:52:41+5:302020-05-22T18:55:35+5:30
कोरोनाचा वाढत्या संसर्गात राज्यातील विकास महाआघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी सांगलीत भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून निषेध केला. तर भाजपच्या या आंदोलनाला कुपवाड शिवसेनेने प्रत्युत्तर देत आम्ही ठाकरे सरकार सोबत असे फलक झळकविले.
सांगली : कोरोनाचा वाढत्या संसर्गात राज्यातील विकास महाआघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी सांगलीत भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून निषेध केला. तर भाजपच्या या आंदोलनाला कुपवाड शिवसेनेने प्रत्युत्तर देत आम्ही ठाकरे सरकार सोबत असे फलक झळकविले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महाआघाडी सरकारला अपयश आल्याच्या दावा करीत सरकारच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, महापौर गीता सुतार, युवा अध्यक्ष दीपक माने यांनी काळे मास्क लावून निषेध केला.
गाडगीळ म्हणाले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यानेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आघाडी सरकार राजकारण करण्यात मग्न आहे. राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याची प्रमाण वाढले आहे. त्यावर सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही.
केंद्राने २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्रात व्यापारी, शेतकरी, बारा बलुतेदार यांची स्थिती गंभीर आहे. सरकारने त्यांच्यासाठी कोणतेही पॅकेज दिलेले नाही. कोरोना योद्धांना पीपीई कीट व इतर सुविधा दिल्या जात नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या साऱ्या गोष्टीला सध्याचे अकार्यक्षम सरकार जबाबदारी असल्याचा आरोप केला.
दरम्यान, भाजपच्या या आंदोलनाला शिवसेनेच्यावतीनेही प्रत्युत्तर देण्यात आले. कुपवाड शिवसेनेच्यावतीने आम्ही ठाकरे सरकारसोबत असे फलक झळकविण्यात आले. तसेच भाजपच्या आंदोलनाचा निषेधही करण्यात आला.
कोरोनाच्या काळात राज्य शासनाकडून चांगले काम सुरू आहे. भाजपला टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्याने राजकीय हेतूने आंदोलन केले जात आहे. भाजपच्या आमदारांनी राजीनामा देऊन निषेध करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख अमोल पाटील, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, अजित कांबळे, अविनाश पवार, रवि आदाटे, राजेंद्र पवार उपस्थित होते.