CoronaVirus : लॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:11 PM2020-06-15T17:11:22+5:302020-06-15T17:12:48+5:30
कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
सांगली : कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
मंगळवेढा तालुक्यातील धुळाप्पा केंगार हे कुटुंबासह काही महिन्यांपूर्वी राजापूर तालुक्यात रस्त्याच्या कामावर होते. तेथे जावडे गावातील माध्यमिक आश्रमशाळेत त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत होत्या. वर्षा व सुवर्णा या दोन मुली सातवी व तिसरीच्या वर्गात होत्या. लॉकडाऊनपूर्वी धुळाप्पा हे सांगलीत हनुमाननगरमध्ये राहण्यास आले, पण मुली शिक्षणासाठी राजापूरलाच राहिल्या.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला अन् मुलींची भेट या कुटुंबाला दुर्मिळ झाली. तिकडे मुलींनाही घरची आठवण होत होती. त्याही दररोज दूरध्वनी करून परत नेण्याची मागणी करीत होत्या. त्यांच्या आर्त हाकेने बापाच्या हृदयाची घालमेल होत होती. मुलींना परत आणण्यासाठी शासकीय पास काढावा लागतो, वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज केंगार यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मुलींचंी कधी भेट होणार, याचीच चिंता त्यांना होती.
केंगार यांनी नगरसेवक अभिजित भोसले यांची भेट घेतली व मुलींना परत आणा, अशी साद घातली. भोसले यांनी राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर परिसरातील मित्रांशी संपर्क साधला. राजापूरहून कोल्हापूर अथवा सांगलीला कोण येणार आहे का, याची चौकशी केली. अखेर चार दिवसांच्या प्रयत्नानंतर राजापूर येथील मेहबूब मठद हे कोल्हापूरला कामानिमित्त येणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वाहनातून या दोन्ही मुलींना कोल्हापूरपर्यंत आणण्याची विनंती केली. मठद यांनीही सहमती दर्शविली.
दोन्ही मुली त्यांच्या वाहनातून कोल्हापूरपर्यंत आल्या. तेथून भोसले यांचे मित्र सुमित पाटील यांनी या मुलींना कोल्हापुरातून सांगलीच्या सीमेपर्यंत म्हणजे अंकलीपर्यंत आणले. पण सीमेवर पोलिसांनी मुलींना अडविले. नगरसेवक भोसले, केंगार हेही सीमेवर होते. त्यांनी कोल्हापूर पोलिसांना विनंती केली.
अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनी करून पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर या मुलींची तपासणी करून त्यांना वडिलांच्या ताब्यात दिले. सांगली पोलिसांनीही मुलींची रजिस्टरवर नोंद करून होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या. अखेर ८१ दिवसांनंतर मुलींशी भेट झाल्याने बापाचे डोळेही पाणावले होते.