CoronaVirus : कारागृहात नव्याने दाखल कैद्यांची स्वतंत्र सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:13 PM2020-05-30T17:13:10+5:302020-05-30T17:15:38+5:30
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे.
सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच जिल्हा कारागृह प्रशासनानेही नव्याने दाखल कैद्यांना जून्या कैद्यांसमवेत कारागृहात न ठेवता त्यांच्यासाठी स्वतंत्र सोय केली आहे.
कारागृहालगत असलेल्या एका शाळेतील दोन खोल्यांमध्ये ३६ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कै द्यांना पॅरोलवर सोडण्याची घोषणा केली होती त्यानुसार जिल्हा कारागृहातील २५ कैद्यांना अंतरीम जामीन मंजूर झाला आहे.
कोरोना संसर्ग वाढत असतानाच कारागृहात असलेल्या कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न राज्यभर निर्माण झाला होता. राज्यातील काही कारागृहांमधील कैद्यांनाही कोरोनाचे निदान झाल्याने अधिक सतर्क ता बाळगली जात होती. त्यामुळे जिल्हा कारागृहातही खबरदारी घेण्यात येत आहे.
त्यामुळे नव्याने कारागृहात दाखल होणाऱ्या कैद्यांकडून संसर्गाची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी कारागृहालगतच असलेल्या एका शाळेच्या दोन खोल्या ताब्यात घेत त्यात ३६ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. याठिकाणी कारागृह आणि पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कारागृहातील संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाने पंधरवड्यापूर्वी कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा कारागृहातील २५ कैद्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा कारागृहात २३५ कैद्यांची क्षमता असून सध्या ३३६ कैदी आहेत.
क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने अडचणी येत असल्यातरी प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. यामुळेच नव्याने विविध गुन्ह्यातील बाहेरून येणाऱ्या कैद्यांना जून्या कैद्यांच्या संपर्कात ठेवण्याचे टाळत त्यांची स्वतंत्र इमारतीत सोय करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात येत आहे. त्याठिकाणी सुविधा व कारागृह कर्मचारी, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नव्याने येणाऱ्या कैद्यांमुळे अगोदर असलेल्या कैद्यांना संसर्ग होऊ नये यासाठी अशी खबरदारी घेण्यात येत आहे.
सुशिल कुंभार,
मुख्य तुरूंग अधिकारी,सांगली