CoronaVirus InSangli : महापालिका क्षेत्रात ४०० जण होम क्वारंटाईन, आकडा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 02:22 PM2020-05-21T14:22:59+5:302020-05-21T14:25:37+5:30
महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईसह परराज्यांतून तीन हजाराहून अधिक नागरिक आले आहेत. यापैकी सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. येत्या काळात परजिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याची माहितीही घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
सांगली : महापालिका क्षेत्रात पुणे, मुंबईसह परराज्यांतून तीन हजाराहून अधिक नागरिक आले आहेत. यापैकी सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. येत्या काळात परजिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्याची माहितीही घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
दरम्यान, होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना २८ दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
१५ मार्चपासून घर टू घर सर्व्हे हाती घेतला होता. या सर्व्हेत २९८ जण परदेशातून आलेले नागरिक आढळले होते. १८ मेपर्यंत सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात ३ हजार १६० लोक आले आहेत.
यात पुण्यातून १५५९, मुंबईतून ७०५, इतर जिल्ह्यांतून ३९८, तर परराज्यांतून आलेल्या ४९८ नागरिकांचा समावेश आहे. यापैकी २७६६ जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला असून सध्या ३९४ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी वॉर्ड समन्वयकांना नगरसेवकांची बैठक घेण्याची सूचना केली. वॉर्डनिहाय परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईनचे आदेश दिलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे.
ही यादी वॉर्ड नियंत्रण समिती, नगरसेवकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. समितीच्या सदस्यांनी होम क्वारंटाईनमधील नागरिकांची नियमित भेट घेऊन, त्यांच्याकडून नियमांचे पालन होते की नाही, याची खातरजमा करायची आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती तातडीने आरोग्य विभागाकडे कळवावी. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या सूचनेनुसार दहा समन्वयकांचे पथक तयार करून, होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
नियंत्रण कक्षाला माहिती कळवा : नितीन कापडणीस
जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. होम क्वारंटाईनचे उल्लंघन करणाऱ्यांना २८ दिवस इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जाणार आहे.
होम क्वारंटाईनमधील व्यक्ती बाहेर फिरत असेल, तर नागरिकांनी त्याची माहिती संबंधित प्रभागाचे नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी. तसेच नियंत्रण कक्षाकडील टोल फ्री क्रमांक १८००२३३२३७४ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.