CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात ७५० पोलीस बंदोबस्तावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:25 PM2020-03-30T17:25:25+5:302020-03-30T17:26:47+5:30
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले असतानाही, जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी ६७ पोलीस अधिकारी, तर ६५८ कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत.
सांगली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले असतानाही, जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी ६७ पोलीस अधिकारी, तर ६५८ कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत.
कोरोना विषाणूचा राज्यभर संसर्ग वाढत असतानाच, प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. तरीही जिल्ह्यात ९ रुग्ण आढळल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. असे असले तरी व कोरोनाची भीती कायम असली तरी, नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी आता पोलिसांनी हातात काठी घेतली आहे.
संचारबंदी व भारत लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी आता पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोना संसर्गाच्या खबरदारीवेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी संपूर्ण जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
सुरूवातीला जमावबंदीचा आदेश नागरी क्षेत्रापुरता मर्यादित होता. आता तो अधिक कडक करत संचारबंदीमुळे पोलिसांवरील ताणही वाढला आहे. त्यानुसार आता जिल्ह्याच्या सर्व सीमाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सीमेवरील तपासणीवेळीही पोलिसांचा बंदोबस्त महत्त्वाचा ठरत आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक गावांनी स्वत:हून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. तिथे जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून यावर तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
महापालिका क्षेत्रात अगदी भाजीपाला, औषध दुकानांसह इतर ठिकाणीही नागरिकांची मोठी गर्दी होत असते. त्याठिकाणीही पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागत आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या ६७ पोलीस अधिकारी व ६५८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत.