CoronaVirus Lockdown : विद्यार्थी घरी परतले, नोकरदारांचे जेवणाविना हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:27 PM2020-04-03T17:27:59+5:302020-04-03T17:29:04+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.
सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत.
सांगली शहर हे शैक्षणिक नगरी म्हणून ओळखले जाते, तर मिरज हे मेडिकल हब आहे. शहरातील अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशातून विद्यार्थी येतात. वालचंद अभियांत्रिकीसारखे जागतिक दर्जाचे महाविद्यालयही सांगलीत आहे. शहरात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी वसतिगृहे आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्च रोजीच राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात अजून देशभर लॉकडाऊन लागू झालेले नव्हते. त्यातच बारावीच्या परीक्षा संपल्याने ते विद्यार्थी घरी गेले. महाविद्यालयांनाही सुटी दिल्याने व सर्वच परीक्षा पुढे ढकलल्याने उर्वरित विद्यार्थ्यांनी घर गाठले.
शहरातील जैन बोर्डिंग, कळंत्रेअक्का महिला वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी गेले आहेत, तर लिंगायत बोर्डिंगमध्ये ९० पैकी केवळ जिल्ह्याबाहेरील तीन विद्यार्थी आहेत. त्यांना घरगुती खानावळीमधून जेवण दिले जात आहे. अशीच काहीशी स्थिती सर्वच वसतिगृहांची आहे. देशभरात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थी घरी परतल्याने वसतिगृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लॉकडाऊननंतर उद्योग, बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचे मात्र हाल होत आहेत. हॉटेल्स, खानावळी बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. देशाच्या विविध प्रांतातून हजारो तरूण नोकरीसाठी शहरात स्थिरावले आहेत. यापैकी काही कारखानदारांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची सक्तीही केली आहे, पण काहींचे मात्र हाल होत आहेत. बँकिंग क्षेत्रात बाहेरील राज्यांतून आलेल्या नोकरदारांना सहकाऱ्यांनी मदतीचा हात दिला असला तरी, त्यांची मोठी कसरत होत आहे.