CoronaVirus Lockdown : निवारा केंद्रातील सुविधांवर लाभार्थी समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:43 PM2020-04-22T12:43:05+5:302020-04-22T12:45:19+5:30
रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी लॉकडाऊनच्या या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 78 निवारागृहामधून 30 हजार 109 गरीब, गरजवंतांना आधार मिळाला आहे. त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
सांगली : रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी लॉकडाऊनच्या या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 78 निवारागृहामधून 30 हजार 109 गरीब, गरजवंतांना आधार मिळाला आहे. त्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
आष्टा येथे सुरू असलेल्या निवारा गृहामध्ये सद्यस्थितीत ७२ जण असून यामध्ये तामिळनाडू राज्यातील 50, मध्यप्रदेश 9, राजस्थान 7, उत्तरप्रदेश 2, बिहार 1 तसेच पुणे, मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 72 जण निवारा केंद्रामध्ये आहेत. निवारा केंद्रामधून देण्यात येत असलेल्या सुविधाबद्दल लाभार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
या निवारा केंद्रात वास्तव्यास असलेले तरूण लिजवान म्हणाले, म्हैसूर येथून दोघेजण उत्तरप्रदेशकडे गावी जात असताना आम्हाला थांबवून आष्टा येथील निवारा केंद्रामध्ये आणण्यात आले. या निवारा केंद्रामध्ये जेवणाबरोबरच अन्य सुविधा चांगल्या मिळत आहेत. डॉक्टर वारंवार येवून तपासणी करत असतात. त्याचबरोबर राष्ट्रगीत व खेळही घेतले जातात. येथील सर्व स्टाफही चांगला आहे, त्यामुळे आम्हाला येथे कोणतेच टेन्शन नाही. तर याच निवारागृहात असणारे हबीब म्हणाले, निवारा केंद्रामध्ये तीन वेळचे जेवण मिळत आहे. खेळाचीही सुविधा आहे. डॉक्टर येवून तपासणी करून जातात. येथे कोणतीही समस्या नाही सर्व लोक ठिक आहेत.
निवारागृहातील नागरिकांना अन्न व इतर जीवनोउपयोगी वस्तुंचा पुरवठा सुरळीत केला जातोच. पण याबरोबरच घरापासून लांब राहिल्यामुळे या नागरिकांच्या मनावर येणारा ताण कमी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून बैठे खेळ, गाण्यांच्या भेंड्या, संगीत खुर्ची, प्राणायाम यासारखे विविध उपक्रम समुपदेशका मार्फत राबविण्यात येतात. घरापासून लांब राहून मानसिक खच्चीकरण झालेल्या या लोकांमध्ये आनंदाची व उल्हासाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच संकटाच्या स्थितीत धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून १२९९ लोकांना २५९८ भोजन थाळींचा लाभ देण्यात येत असल्याचेही सांगितले.