CoronaVirus Lockdown : शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:20 PM2020-04-25T12:20:03+5:302020-04-25T12:23:27+5:30
लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या या उपक्रमास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद आहे.
मिरज : लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या या उपक्रमास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद आहे.
लॉकडाऊनमुळे वाहतूक व परराज्यातील बाजार बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषीमाल शेतात पडून आहे. मात्र आरग येथील एक हजार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार केला आहे. रयत फार्मर्स प्रोड्युसर या नावाने तेकृषी मालाचे उत्पादन व विक्री करतात.
शेताच्या बांधावरून भाजी व फळे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत आणून विक्री सुरु आहे.विविध प्रकारचा हायजिनीक भाजीपाला घरपोच करण्याची संकल्पना यांनी राबवली आहे. ताजा व स्वच्छ भाजीपाला थेट घरापर्यंत पोहोचत असल्याने सांगली-मिरजेतील ग्राहकांची चांगली मागणी आहे.
शेतकऱ्यांनी १० ते १२ किलो वजनाचे भाजीपाल्याचे पॅकबंद कीट तयार केले आहे. त्यात कांदा, बटाटा, लसून, वांगी, दोडका, दुधी भोपळा, कढीपत्ता, आले, कोथिंबीर, शेवगा, टोमॅटो यासारख्या सोळा प्रकारच्या भाज्या व कलिंगड, चिक्कू या दोन फळांचा समावेश आहे. बाजारभावाप्रमाणे या भाज्यांचा दर साधारण सहाशे रुपयापर्यंत होतो. मात्र साडेतीनशे रुपयात हा भाजीपाला सांगली व मिरज शहरात विक्री होत आहे. मागणीसाठी फोन व व्हॉट्स अॅपचा वापर केला जात आहे.
तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी, कमी दरात घरपोच भाजीपाला विक्रीचा उपक्रम शेतकºयांच्या व ग्राहकांच्या हिताचा असल्याचे सांगितले. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याहस्ते रयतच्या शेतीमालाच्या कीटचे ग्राहकांना वितरण सुरु करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी दलाल व व्यापारी वगळून शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री केल्याने दोघांचाही फायदा असल्याचे सांगितले.
३५० रुपयात...
कांदा : १ किलो
बटाटा : १ किलो
टोमॅटो : अर्धा किलो
कोबी : १ नग
काकडी : अर्धा किलो
ढबु मिरची : दीड किलो
आले, लिंबू, कडीपत्ता : ५ नग
हिरवी वांगी : १ किलो
दोडका/गवार : १ किलो
कारली : अर्धा किलो
मेथी/कोथिंबीर : १ पेंडी
लसूण : १०० ग्राम
शेवगा/घेवडा : १ किलो
चिक्कू : १ किलो
कलिंगड/पपई : १ नग