CoronaVirus Lockdown :सांगलीतील फौजदार गल्ली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:04 PM2020-05-13T15:04:13+5:302020-05-13T16:49:57+5:30
सांगली शहरातील फौजदार गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी महापालिका यंत्रणेची धावपळ उडाली. तात्काळ फौजदार गल्लीचा परिसर सील करण्यात आला असून, औषध फवारणीसह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.
सांगली : शहरातील फौजदार गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी महापालिका यंत्रणेची धावपळ उडाली. तात्काळ फौजदार गल्लीचा परिसर सील करण्यात आला असून, औषध फवारणीसह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी फौजदार गल्लीला भेट देऊन, उपाययोजनांच्या सूचना केल्या.
फौजदार गल्लीतील ४० वर्षांच्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने तात्काळ फौजदार गल्लीकडे धाव घेतली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. ताटे, डॉ. वैभव पाटील, डॉ. शबाना लांडगे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी, वैभव कांबळे यांच्यासह लिंक वर्कर्सचे पथक फौजदार गल्लीत दाखल झाले. तातडीने औषध फवारणी, धूर फवारणी हाती घेण्यात आली.
कोरोनाबाधित महिलेच्या घरातील तिघांना मिरजेतील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधही सुरू केला आहे. पोलिसांनी फौजदार गल्लीचा २०० मीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.
बफर झोनचा परिसर सील करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. या झोनमधील नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम बुधवारपासून हाती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.