CoronaVirus Lockdown : खुद्द कृषी राज्यमंत्र्यांनी शेतामध्येच लावून दिलं कार्यकर्त्यांचं लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:13 PM2020-05-14T18:13:16+5:302020-05-14T18:15:22+5:30
चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
कडेगाव : देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं असतानाही सोशल डिस्टनसिंगचे पालन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नंही झाल्याची उदाहरणं आहेत. मात्र आता चिंचणी तालुका कडेगाव येथे एक अनोखं लग्न झालं. कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्यांचं लग्न चक्क शेतामध्ये लावून दिलं. या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
याबाबत माहिती अशी की, चिंचणी तालुका कडेगाव येथील अजय पाटील आणि कामळापूर तालुका खानापूर येथील भाग्यश्री गायकवाड यांचा विवाह लोकडाऊनमुळे दिवसेंदिवस लांबत चालला होता. लग्न दिमाखदार सोहळ्यात करण्याची दोघांच्याही कुटुंबियांची इच्छा होती.
काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व युवा नेते डॉ.जितेश कदम यांचेशी अजयचे याबाबत बोलणे झाले. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वतःच उपाय शोधून काढत गुरुवारी १४ मे रोजी दुपारी अजयच्या चिंचणी येथील शेतामध्ये लग्न घेण्याचा विचार
मांडला .त्याला दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिला.
प्रशासनाकडून मोजक्या १० लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी घेण्यात आली. त्याप्रमाणे नवरीकडील ५ आणि नावऱ्याकडील ५ अशा फक्त १० लोकांच्या उपस्थित शेतामध्ये विवाह संपन्न झाला.
यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम व डॉ.जितेश कदम यांनी स्वतः उपस्थितीत राहून वधू - वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले .या लग्नाला नवरा नवरीचे आई वडील आणि भटजी यांचेसह फक्त १० लोक उपस्थित होते.
लग्न खर्चाऐवजी गरिबांना जीवनावश्यक वस्तू
या विवाह सोहळ्यासाठी होणारा मोठा खर्च टाळून या पैशातून गावातील गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंची किट घरोघरी पहोच करण्यात आली आहेत. या आदर्शवत उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.