coronavirus: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन गरजेचा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 01:30 AM2020-09-02T01:30:33+5:302020-09-02T06:38:53+5:30
सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत.
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जयंत पाटील यांनी सांगलीतील पत्रकारांशी आॅनलाईन संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संसर्ग साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनचा फारसा उपयोग झाला नाही. लोक कोरोनाबद्दल गाफील आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करण्यास ते टाळाटाळ करीत आहेत.
ते म्हणाले, प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. पण, अनेक रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणाºया वागणुकीबद्दल तक्रारी येत आहेत. रुग्ण व नातेवाईकांत त्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी अशा तक्रारींची शहानिशा करूनच संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी जिल्ह्याची सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम तयार करावी. रुग्णांनी बेड शोधत फिरण्यापेक्षा त्यांना या सिस्टिममधून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
मुंबईतील डॉक्टर्स, कर्मचारी बोलावणार
जयंत पाटील म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सांगलीत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांना सांगलीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांचीही पुरेशी उपलब्धता व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात शक्य
जयंत पाटील म्हणाले, सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात करता येते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे. जिल्हाधिकाºयांसोबत फिरून मी परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार आहे.