CoronaVirus Lockdown : जिल्ह्यातील ग्रामस्थांना धास्ती पुणे-मुंबईकरांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:57 PM2020-05-20T14:57:30+5:302020-05-20T14:58:31+5:30
कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात दोन महिन्यांपासून यशस्वी ठरलेल्या गावकऱ्यांना आता पुणे-मुंबईकर पाहुण्यांची धास्ती लागून राहिली आहे. शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर देशभरातून लोक आपापल्या गावी येऊ लागले आहेत. ग्रामस्थांसाठी ही चिंतेची बाब ठरली असून गावोगावी संघर्षाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत.
सांगली : कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात दोन महिन्यांपासून यशस्वी ठरलेल्या गावकऱ्यांना आता पुणे-मुंबईकर पाहुण्यांची धास्ती लागून राहिली आहे. शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर देशभरातून लोक आपापल्या गावी येऊ लागले आहेत. ग्रामस्थांसाठी ही चिंतेची बाब ठरली असून गावोगावी संघर्षाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत.
पुणे आणि मुंबईतील बराच भाग रेड झोन ठरल्याने त्याचा धसका गावकऱ्यांंनी घेतला आहे. जिवाभावाच्या पाहुण्यांना चारहात दूरच ठेवण्याची मानसिकता कोरोनाने गावकºयांंत तयार केली आहे. याचे अनुभव गावोगावी येत आहेत.
पाहुण्यांच्या विलगीकरणासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा खुल्या करुन, गावात प्रवेशापासून त्यांना थांबवले जात आहे. काही ठिकाणी चोरीछुपे घरात येण्यात पाहुणे यशस्वी ठरले आहेत. त्यांची माहिती ग्रामपंचायत आणि आरोग्य यंत्रणेपासून लपविली जात आहे.
नोकरी-व्यवसायानिमित्त कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली येथेही मोठ्या संख्येने मराठी मंडळी आहेत. त्यांचे गावातील आगमन ग्रामस्थांसाठी डोकेदुखी बनत आहे. यावरुन गावोगावी समरप्रसंग उद्भवत आहेत. शासनाने परवानगी दिल्यानंतर तब्बल १९ हजार लोक जिल्ह्यात आले आहेत.
यामध्ये पुण्या-मुंबईच्या लोकांची संंख्या जास्त आहे. सोमवारअखेरपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतरावर पोहोचली होती. यातील बहुसंख्य बाधित परगावाहून आले आहेत. त्यांच्यामुळेच अनेक गावांत स्थानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाहुण्यांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवले तरी, पुरेसा बंदोबस्त होत नसल्याचे आढळले आहे.
गावातील नातेवाईकांकडून त्यांना जेवणाचे डबे पोहोचविणे, शाळेत जाऊन गप्पा मारत बसणे असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना व्यवस्थापन समित्यांनी आता त्यांचे होम क्वारंटाईन सुरु केले आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.