CoronaVirus Lockdown : सांगलीची बाजारपेठ पुन्हा गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:56 PM2020-05-22T18:56:48+5:302020-05-22T19:00:15+5:30
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही.
सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी खुली झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजली. कोरोनाची धास्ती मनात घेऊनच व्यापाऱ्यांनी व्यवसायाचा नव्याने शुभारंभ केला. मात्र चार दिवसांपूर्वी झालेली गर्दी आज पहायला मिळाली नाही. दुपारनंतर ग्राहकांची गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. गणपती पेठेत मात्र दिवसभर रेलचेल होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती.
तब्बल दीड महिन्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने पूर्णपणे उघडली होती. तसे गत सोमवारपासूनच बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास सुरूवात झाली होती. जिल्हा प्रशासन व महापालिकेने एक दिवसाआड एका बाजूची दुकाने उघडण्यास परवागनी दिली होती.
तेव्हा पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. बहुतांश दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासण्यात आला होता. नागरिकांच्या बेशिस्तीमुळे बाजारपेठेत वाहतुकीचीही कोंडी झाली होती.
आता शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून संपूर्ण बाजारपेठ एकाच वेळी उघडण्यास परवानगी देण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंतच बाजारपेठ सुरू राहणार असल्याने सकाळपासून व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली होती. हरभट रोड, गणपती पेठ, कापडपेठ, मेन रोड, सराफ कट्टा, दत्त-मारुती रोड, स्टेशन रोडसह विविध भागात दहा वाजेपर्यंत पूर्ण बाजारपेठेतील दुकाने उघडली होती.
दुकानात प्रवेश करताना ग्राहकांना सॅनिटायझरही दिले जात होते. तसेच अनेक दुकानासमोर चौकोनी पट्टेही मारण्यात आले होते. शासनाच्या नियमांचे बºयाच दुकानदारांनी पालन केले होते.
गेली चार दिवस बाजारपेठेतील दुकाने खुली झाल्यामुळे शुक्रवारी सकाळी गर्दी होती. कापड, भांडी, मोबाईल दुकानात मात्र गर्दी होती. सराफ पेठेतही ग्राहकांची गर्दी कमीच होती. काही मोजक्याच सराफी दुकानात ग्राहक दिसत होते.
गणपती पेठेत मात्र मालाची आवक-जावक मोठ्या प्रमाणात होत होती. ट्रक व इतर वाहनातून दुकानात माल उतरविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती.
हातगाडी, फळ विक्रेत्यांना बंदी
बाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी दुकानासमोर हातगाडी, फळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यातून काही ठिकाणी हातगाड्यावर मालाची विक्री सुरू होती. तर फळ विक्रेत्यांनी दुकानासमोर ठाण मांडले होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी बाजारपेठेत फिरत होती. हातगाडीवरील व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही ध्वनीक्षेपकांवरून दिल्या जात होत्या. महापालिकेची गाडी आल्यानंतर काहीजणांनी हातगाडी, फळांच्या टोपल्या हलविल्या. पण गाडी पुढे जाताच पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले.