CoronaVirus Lockdown : एसटी, सर्व दुकाने, पान टपऱ्या शुक्रवारपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:30 PM2020-05-21T12:30:19+5:302020-05-21T12:31:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनच्या कालावधित शासनाने ३१ मेपर्यंत वाढ केली आहे. नवीन नियमानुसार काही आस्थापनांना सूट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनच्या कालावधित शासनाने ३१ मेपर्यंत वाढ केली आहे. नवीन नियमानुसार काही आस्थापनांना सूट दिली आहे, असून वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारपासून जिल्हांतर्गत बससेवा, पान दुकाने, बाजारपेठेतील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. चौधरी म्हणाले की, आता रेड व नॉनरेड असे दोनच झोन असणार आहेत. सांगलीचा समावेश नॉनरेड झोनमध्ये असल्याने उद्यापासून काही बदल होणार आहेत. त्यानुसार सध्या बंद असलेली पान दुकाने सुरू होणार असली तरी, केवळ पार्सल सेवाच द्यायची असून, ग्राहकांनी दुकानासमोर थांबून थुंकल्यास, दुकान चालकावर दुकान बंदीची कारवाई होणार आहे. ग्राहकाकडूनही थुंकल्याबद्दल ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, शिक्षण संस्था, क्लासेस, व्यायामशाळा, चित्रपटगृहे बंदच राहणार असून, गर्दी न करता व्यायामासाठी फिरण्यास हरकत नसेल. हॉटेल्स बंद असली तरी घरपोच सुविधा चालू राहणार असून, मॉल्स बंद राहणार आहेत.
सर्व दुकानांच्या वेळेतही बदल करण्यात आला असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सुरू ठेवताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसले नाही, तर त्या दुकानावर कारवाई होणार आहे. त्यामुळे गर्दी न करता, योग्य अंतराने ग्राहकांना सेवा देण्यात यावी.
जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक आहे. आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार सेवा सुरू ठेवता येणार आहे.
विवाहास ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधीलाही ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
चौकट
ह्यनाईट कर्फ्यूह्ण उद्यापासून लागू
उद्या, शुक्रवारपासून नवीन लॉकडाऊनचे नियम लागू होतानाच, सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू असेल. संपूर्ण भागात ह्यनाईट कर्फ्यूह्ण बंधनकारक असल्याने कोणीही या वेळेत बाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले.
चौकट
गावबंदी, रस्तेबंदी नाही
अनेक गावात परस्पर गावातील रस्ते बंद करण्यासह लॉकडाऊन पाळण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून, असे परस्पर निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई करू. गावातील सार्वजनिक रसत्यांवर अडथळे निर्माण केले असतील, तर ते दूर केले जातील.