CoronaVirus Lockdown : विद्यार्थ्यांची आॅनलाईन सत्त्वह्यपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 02:07 PM2020-05-20T14:07:03+5:302020-05-20T14:08:54+5:30
सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ...
सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ठरले आहे. स्मार्टफोनचा अभाव आणि नेटवर्कची समस्या यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांना परीक्षा शक्य झालेली नाही.
प्राथमिक विद्यार्थी दोन महिन्यांपासून शाळेपासून दूर आहेत. सध्या उन्हाळी सुट्यांचा काळ सुरु आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत शाळा बंदच राहतील. लॉकडाऊनमुळे परीक्षा किंवा मूल्यमापनही झालेले नाही.
यादरम्यान, जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांचे आॅनलाईन मूल्यमापन सुरु केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव आहे. जत, आटपाडी, शिराळा आदी तालुक्यांतील खेडोपाडी थ्री जी किंवा फोर जी नेटवर्क मिळत नाही. यामुळे नोंदणी करणे, उत्तरपत्रिका सबमीट करणे यात अडचणी येत आहेत.
पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉग ईनचा प्रयत्न केल्याने सर्व्हर कोलमडला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने वेगवेगळ्या वर्गांचे वेगवेगळे नियोजन केले. मात्र आता मोबाईलच्या समस्या येत आहेत.
पालकांकडील स्मार्टफोन मुलांसाठी उपलब्ध होत नसल्याचा अनुभव आहे. सर्रास पालक शेतकरी असल्याने सायंकाळीच घरी येतात, त्यामुळेही मुलांना फोन उपलब्ध होत नाही. अनेक पालकांकडे स्मार्टफोनही नाही.
लॉकडाऊन काळात रोजगाराअभावी खाण्या-पिण्याचे वांदे असताना, बॅलन्स कोठून भरणार, असाही प्रश्न आहे. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी मूल्यमापनापासून वंचित राहिले आहेत.