CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:46 PM2020-05-22T17:46:29+5:302020-05-22T17:50:00+5:30
मिरजेतील उत्कृष्ट उपचारपद्धती, आरोग्य विभागाची राबणूक यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या, देशाच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील प्रमाण ६१ टक्के आहे. मृत्यूचे व अहवाल पॉझिटिव्हचे प्रमाणही अत्यंत कमी आहे.
अविनाश कोळी
सांगली : मिरजेतील उत्कृष्ट उपचारपद्धती, आरोग्य विभागाची राबणूक यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या, देशाच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील प्रमाण ६१ टक्के आहे. मृत्यूचे व अहवाल पॉझिटिव्हचे प्रमाणही अत्यंत कमी आहे.
जिल्हा आज सुरक्षित झोनमध्ये असून, लोकांनाही येथील आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वास वाटू लागला आहे. जिल्ह्यात २0 मे पर्यंत ६२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३८ रुग्ण म्हणजे ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४० टक्के असून, राज्यातील प्रमाण २६ टक्के आहे. त्या तुलनेत सांगली जिल्हा पुढे आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांमध्ये निगेटिव्ह चाचण्यांचे प्रमाण ८७ टक्के असून, जिल्ह्यात १९ मेपर्यंत एकूण चाचण्यांमध्ये ९६ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण सध्या ३.५३ टक्के, तर जिल्ह्यातील प्रमाण १.६१ टक्के आहे.
जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व परदेशातून येणाऱ्या लोकांच्या योग्य नोंदी घेतल्या जात असून, होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याबाबतचे नियोजन काटेकोर आहे. त्यामुळे समूह संसर्गाचा धोका निर्माण झालेला नाही. जिल्हा व राज्याबाहेरून सांगलीत येणाºया स्थानिकांचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. तरीही कोरोनाच्या दररोज होणाºया चाचण्यांच्या अहवालात निगेटिव्हचे प्रमाण अधिक आहे.