CoronaVirus : मणदूर परिसर बनला कोरोनाचा हॉट स्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 03:25 PM2020-06-12T15:25:58+5:302020-06-12T15:26:47+5:30
शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यातील मणदूर गाव कोरोना रुग्णांचा हॉट स्पॉट बनला आहे. मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कामुळे येथे रुग्ण वाढत आहेत. या गावात ३०, तसेच येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने सोनवडे-काळोखेवाडी येथील दोन नातेवाईक, असे ३२ रुग्ण बाधित आहेत. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
मणदूर गावाची लोकसंख्या १६४४ असून ३३४ कुटुंबे आहेत. मुंबईहून गावात सुमारे ६०० नागरिक आले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन केले होते. मात्र, त्यांचा गावातील अनेक नागरिकांशी संपर्क आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दोनवेळा गावास भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम दररोज गावास भेट देत असून, कामकाजावर नियंत्रण ठेवून आहेत. आरोग्य विभागाकडून डॉ. एम. आर. परब, डॉ. एन. जे. गवार, डॉ. पिनातपाणी चिवटे यांच्यासह पथक कार्यरत आहे.
दररोज सकाळी प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जात आहे. रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेणे, एखाद्यात कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्याच्या घशातील स्रावांचे नमुने घेतले जात आहेत. ५० वर्षावरील ३७८ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी केली जात आहे. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना अन्नधान्य व औषधे घरपोच दिली जात आहेत.
आजअखेर १९८ नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे येथे कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी वर्गाची चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली आहे.
पहिला रुग्ण ३१ मे रोजी सापडला आणि यानंतर सतत रुग्णांत वाढ होत आहे. २७ नागरिकांना मणदूर येथील जिल्हा परिषद शाळेत, तर १३ नागरिकांना शिराळा येथे संस्था क्वारंटाईन केले आहे. गुरुवारच्या सहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले.