CoronaVirus News: कोल्हापुरातील कोरोना चाचणी नमुने पुन्हा मिरजेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:09 AM2020-05-02T05:09:40+5:302020-05-02T05:10:17+5:30
प्रयोगशाळेत त्रुटीमुळे तेथील कोरोना संशयितांचे नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नमुन्यांची संख्या वाढल्याने मिरजेतील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे.
मिरज : कोल्हापुरात कोरोना तपासणी प्रयोगशाळेत त्रुटीमुळे तेथील कोरोना संशयितांचे नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नमुन्यांची संख्या वाढल्याने मिरजेतील प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. मिरजेत १ एप्रिलपासून प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर चार जिल्ह्यातील सुमारे २४०० नमुन्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. कोल्हापुरात संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळा सुरू झाल्याने सोमवारपासून मिरज सिव्हिलमध्ये प्रयोगशाळेत कोल्हापुरातील नमुने पाठविणे बंद करण्यात आले. मात्र कोल्हापुरातील प्रयोगशाळेत तपासणी अहवालात त्रुटी आढळल्याने दोनच दिवसांत नमुने पुन्हा मिरजेला पाठविण्यात येत आहेत. गुरुवारी कोल्हापुरातून आलेले नमुने मिरजेतील प्रयोगशाळेत स्वीकारण्यास नकार देण्यात आला. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीने नमुने स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळाली.
कोल्हापुरात तपासणीची सोय झाल्याने मिरजेत तीन जिल्ह्यांतील नमुने तपासणीसाठी येत असल्याने प्रलंबित राहणाऱ्या नमुन्यांची संख्या कमी झाली होती; मात्र कोल्हापुरातील प्रयोगशाळेतील तपासणी पद्धतीतील त्रुटी दूर होईपर्यंत तेथील नमुन्यांची मिरजेतच तपासणी होणार आहे. मिरजेतील प्रयोगशाळेत दररोज सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे दररोज दोनशे नमुने तपासणीसाठी येतात. यापैकी ४० टक्के नमुन्यांची तपासणी प्रलंबित रहात आहे. प्रयोगशाळेत तपासणी करणाºया ‘रियल टाईम पीसीआर’ या उपकरणासाठी रसायनांचे मिश्रण करणारे स्वयंचलित उपकरण नसल्याने व पुरेसे तपासणी कीटस् उपलब्ध होत नसल्याने तपासणीची गती संथ आहे. तपासणी क्षमता कमी असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे.
कोल्हापुरात चाचणी किटची टंचाई
कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. कोल्हापूर व मिरजेत तपासणी प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या एकाच नमुन्याचा अहवाल दोन्हीकडे वेगवेगळा आल्याचा प्रकार घडला. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून नमुने पुन्हा मिरजेत पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरातील प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी मिरजेतील प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेतले आहे. कोल्हापूर प्रयोगशाळेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात येत असल्याची माहिती मिळाली; मात्र कोल्हापुरात चाचणी किटची टंचाई असल्याने नमुने पुन्हा मिरजेत येत असल्याचे सांगण्यात आले.