CoronaVirus : क्वारंटाईनसाठी नव्याने सातशे खाटांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 03:45 PM2020-05-30T15:45:31+5:302020-05-30T15:49:04+5:30
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या दोन ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) केले जात आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने आणखी तीन ठिकाणी ७०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे.
कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावेत यासाठी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो व त्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवले जाते.
सध्या जिल्हा क्रीडा संकुल व मिरज पॉलिटेक्निक येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरजेत १६०, तर क्रीडा संकुलात ६५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या क्रीडा संकुलातील क्वारंटाईन कक्षात एकही संशयित नाही. मिरजेतील कक्षात ७३ जण दाखल आहेत. त्यातील एक इमारत ही संपर्कातील व्यक्तींसाठी, तर एक इमारत उपचारानंतर निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींसाठी राखीव आहे.
गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या तीन दिवसात नव्याने सोळा रुग्ण आढळून आले आहेत. सांगलीच्या आसपासच्या जिल्ह्यांत कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच मुंबई-पुण्याहून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.
कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईहून आलेल्या व्यक्तींची आहे. भविष्यात कोरोनाचा धोका वाढल्यास इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमधील संशयितांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेने नव्याने तीन ठिकाणी क्वारंटाईन कक्ष सुरू करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.
इन्स्टिट्यूट क्वारंटाईनसाठी महापालिकेने सैनिक वसतिगृह आणि शांतिनिकेतन येथील दोन इमारती अधिग्रहित केल्या आहेत. यासह वसंतदादा कारखान्याच्या परिसरातील इमारतीतही क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नव्याने सातशे खाटांची व्यवस्था केली आहे. एकूणच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने ९०० व्यक्तींच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी तयारी पूर्ण केली आहे.
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधील खाटा
- मिरज पॉलिटेक्निक : १६०
- जिल्हा क्रीडा संकुल : ६५
- वसंतदादा कारखाना : १००
- शांतिनिकेतन : ४८०
- सैनिक वसतिगृह : ९६