Coronavirus: सांगलीतील शिवप्रतिष्ठानची रॅली रद्द; 'कोरोना'चा संभाजी भिडेंनाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 11:57 AM2020-03-15T11:57:19+5:302020-03-15T12:08:34+5:30
गेल्या 35 वर्षांपासून संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथून ही रॅली काढण्यात येत असते.
सांगली :कोरोना साथीची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील आकडा शनिवारी सर्वाधिक होऊन ३१ पर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने या घातक विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रतिबंधक उपायही अधिक कडक केले. त्यानुसार राज्यातील यात्रा, शासकीय कार्यक्रम आणि गर्दी होईल अशा कार्यक्रमांना परवानगी ने देण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचा फटका शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना सुद्धा बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत निघणारी शिवप्रतिष्ठानची रॅली रद्द करण्यात आली आहे. गेल्या 35 वर्षांपासून संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथून ही रॅली काढण्यात येत असते. यावेळी मोठ्याप्रमाणावर तरुणाचा सहभाग पाहायला मिळतो. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता आणि प्रशासनाला सहकार्य म्हणून ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे समन्वयक नितीन चौगुले यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या रॅलीचे नेतृत्व संभाजी भिडे हे करत असतात.
चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनानं जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात 156,396 कोरोना व्हायरसनं संक्रमित झालेले रुग्ण आढळून आले असून, त्यात चीनमध्ये जवळपास 80955 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्याच्या खालोखाल इटलीमध्ये 21,157 रुग्ण संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जगात कोरोना संक्रमित 5833 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात 3085 मृत्यूचा आकडा एकट्या चीनमधला आहे.