CoronaVirusInSangli : जिल्ह्यात आणखी सहाजणांना कोरोना, रुग्णसंख्या ६५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:27 PM2020-05-21T12:27:40+5:302020-05-21T12:29:06+5:30
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सांगली : जिल्ह्यातील आणखी सहाजणांचा कोरोना अहवाल बुधवारी रात्री पॉझिटीव्ह आला. सोहोली (ता. कडेगाव) येथील दोघांचा, तर रेड (ता. शिराळा), मिरजेतील हडको कॉलनी, आटपाडीतील गोंदीरा मळा, पिंपरी बुद्रुक (ता. आटपाडी) येथील प्रत्येकी एकाचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असताना, बुधवारी एकाच दिवशी सहाजणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. शिराळा तालुक्यातील रेड येथे मुंबईहून पती-पत्नी आले होते. या दोघांना गावातील शाळेत कम्युनिटी क्वारंटाईन करण्यात आले होते.
सोमवारी त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यात ४२ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निदान मंगळवारी झाले होते, तर बुधवारी कोरोनाबाधित महिलेच्या ४९ वर्षीय पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित महिला कोरोनाबाधित झाली होती. या महिलेचे कु टुंब रविवारी गावाकडे आले होते. आरोग्य यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते. यापैकी तिचा चुलत सासरा आणि चुलत दीर या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दिल्लीहून मिरज येथील भारतनगर हडको कॉलनीत आलेल्या पती-पत्नी दोघांना मिरजेत दाखल करण्यात आले होते. त्यातील महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे अकोला येथून आलेल्या एकास, तर गोंदीरा मळा (आटपाडी) येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याने आटपाडी तालुक्यात एकाच दिवशी दोन रुग्ण वाढले आहेत.
अंत्री खुर्दचा तो निगेटिव्ह!
शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील ४२ वर्षीय व्यक्तीचे मुंबईत १२ मेरोजी घशातील स्रावाचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या व्यक्तीला मिरज कोविड रुग्णालयात दाखल केले होते व तातडीने नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.