‘महावितरण’च्या भाेंगळ कारभाराविरोधात नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:40+5:302021-05-15T04:25:40+5:30

विटा : विटा नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या वीज खंडित होण्याच्या गेल्या दीड महिन्यापासूनच्या प्रश्नात अद्यापपर्यंत सुधारणा झालेली नाही. परिणामी, विट्यातील ...

Corporators are aggressive against the corrupt management of 'Mahavitaran' | ‘महावितरण’च्या भाेंगळ कारभाराविरोधात नगरसेवक आक्रमक

‘महावितरण’च्या भाेंगळ कारभाराविरोधात नगरसेवक आक्रमक

Next

विटा : विटा नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेच्या वीज खंडित होण्याच्या गेल्या दीड महिन्यापासूनच्या प्रश्नात अद्यापपर्यंत सुधारणा झालेली नाही. परिणामी, विट्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘महावितरण’ने येत्या दोन दिवसांत आळसंद व घोगाव येथील विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा सोमवारी (दि. १७) विटा पालिकेचे सर्व नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा नगरसेवकांनी महावितरणला दिला.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून घोगांव व आळसंद या दोन्ही ठिकाणी दिवसभरात दहा ते बारा वेळा पाच-दहा मिनिटांचे ट्रिपिंग येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची लिंक तुटते व संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा होत नाही. दि. १३ मे रोजी तर आळसंद येथे दुपारी १ ते सायंकाळी ७ पर्यंत वीज खंडित होती तसेच आज शुक्रवारी ही सकाळपासून दीड तास वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

उन्हाळा व कोविडच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या सततच्या पाणीटंचाईने शहरातील नागरिक व नगरपालिका कौन्सिल सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याचे पाण्यासाठी एक्स्प्रेस फिडर वीज जोडणी असताना ‘महावितरण’कडून होत असलेल्या दिरंगाई व बेफिकिरीमुळे विटेकर नागरिकांचे एन उन्हाळ्यात होत असलेले हाल अक्षम्य आहेत. त्यामुळे ‘महावितरण’ने या कामी कोणतीही सबब न सांगता दोन दिवसांत घोगांव व आळसंद येथील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित होईल, ट्रिपिंग पूर्णपणे बंद होईल याची कार्यवाही करावी अन्यथा सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी आम्ही विटा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू. शांतता, सुव्यवस्था व कोविडच्या पार्श्वभुमीवर याचे जे परिणाम होतील , त्यास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा यावेळी नगरसेवक किरण तारळेकर यांच्यासह नगरसेवकांनी ‘महावितरण’ला दिला.

Web Title: Corporators are aggressive against the corrupt management of 'Mahavitaran'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.