महापालिकेच्या बांधकाम कार्यालयात नगरसेविकेचे ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:48+5:302021-06-17T04:18:48+5:30
सांगली : प्रभागातील विकासकामे मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत, दुसऱ्या ठेकेदाराने निविदा भरू नये, यासाठी एका नगरसेविकेने महापालिकेच्या कार्यालयात दिवसभर ठाण ...
सांगली : प्रभागातील विकासकामे मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत, दुसऱ्या ठेकेदाराने निविदा भरू नये, यासाठी एका नगरसेविकेने महापालिकेच्या कार्यालयात दिवसभर ठाण मांडले होते. काही ठेकेदारांशी त्यांचे खटकेही उडाले. शेवटी मिन्नतवाऱ्या करून ठेकेदारांना निविदा अर्ज घेण्यापासून परावृत्त करण्यात नगरसेविकेला यश आले. या प्रकाराची महापालिका वतुर्ळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्येक नगरसेवकाला सहा लाखांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. या निधीतून प्रत्येकी तीन लाखांची दोन कामे करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाने प्रभागातील दोन कामांचे प्रस्ताव दिले. ही कामे लिफाफा पद्धतीने केली जाणार आहेत. त्यासाठी निविदा अर्ज घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत होती. एका नगरसेविकेने आपल्या प्रभागातील दोन कामे प्रस्तावित केली. या कामासाठी ठेकेदारही परस्परच निश्चित केला. या ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मंगळवारी महापालिकेच्या एका कार्यालयात निविदा भरण्यासाठी अर्ज वाटपाचे काम सुरू होते. संबंधित नगरसेविका त्या कार्यालयात गेल्या. तिथे त्यांनी ठाण मांडले. आपल्या कामासाठी दुसऱ्या ठेकेदाराने निविदा भरली तर अडचण होईल, म्हणून त्या निविदा अर्ज घेण्यासाठी येणाऱ्या ठेकेदारांना या दोन कामांसाठी निविदा न भरण्याची विनंती करत होत्या. आधी त्यांची भाषा दमदाटीची होती. पण काही ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरणारच, असा पवित्रा घेतल्यानंतर त्या नरमल्या. त्यांनी मिन्नतवारी सुरू केली. अखेर ठेकेदारांनी त्यांच्या कामासाठी निविदा न भरता या प्रकरणावर पडदा टाकल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.