नगरसेवक म्हणतात... ही कसली स्मार्ट सिटी!
By admin | Published: July 21, 2015 12:46 AM2015-07-21T00:46:02+5:302015-07-21T00:49:20+5:30
महापालिका सभा : महापौर-केळकर यांच्यात वादावादी
सांगली : महापालिका क्षेत्राचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात व्हावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याच्या विषयावरून महापालिकेच्या रविवारी झालेल्या सभेत जोरदार चर्चा झाली. अनेक सदस्यांनी, ही कसली स्मार्ट सिटी?, असा सवाल उपस्थित करून, महापालिका क्षेत्राला रिटायर्ड सिटी, डर्टी सिटीची उपमा दिली. याच मुद्द्यावरून महापौर विवेक कांबळे व भाजपच्या नगरसेविका स्वरदा केळकर यांच्यात वादावादी झाली.
केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्पर्धेत भाग घेण्याचा विषय सभेच्या विषयपत्रिकेवर होता. यावर स्वरदा केळकर यांनी आक्षेप घेतला. शहर सुधारणेच्या बाबतीत कोणत्याही सुधारणा न करता कोणत्या आधारावर आपली महापालिका या स्पर्धेत भाग घेत आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, स्वयंमूल्यांकन करून महापालिकेने ५७ गुण मिळविले असले तरी, ही महापालिका शून्य गुणांच्याही पात्रतेची नाही. महापालिकेची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू नसून रिटायर्ड सिटीकडे सुरू आहे. महिलांसाठी पुरेशी शौचालये, शुद्ध पाणी, चांगले रस्ते, सांडपाणी निचरा, वाचनालये, क्रीडांगणे, गटारी, स्वच्छता, पर्यटन विकास अशा सर्वच गोष्टीत सांगली पिछाडीवर आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावर महापौरांनी त्यांना जबाबदारीने मत व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या एकूणच मतावर महापौरांनी आक्षेप घेतल्यामुळे केळकर व त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
गौतम पवार म्हणाले की, महापालिकेने स्पर्धेत उतरण्याच्यादृष्टीने कोणतीही तयारी केलेली नाही. शेजारीच असलेल्या कवठेपिरान, हातनूर या गावांचा आदर्श महापालिकेने घेतला पाहिजे.
जगन्नाथ ठोकळे म्हणाले की, सांगली शहरातील सांडपाणी अजूनही नदीत मिसळत आहे. सुविधा, स्वच्छता आणि प्रशासकीय शिस्त, योजना याबाबतीत महापालिका अजून खूप पिछाडीवर आहे. शेखर माने म्हणाले की, ई-गव्हर्नन्स योजना बंद करून महापालिकेने चूक केली आहे. तरीही महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)