सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

By admin | Published: March 22, 2017 11:37 PM2017-03-22T23:37:27+5:302017-03-22T23:37:27+5:30

मेधा पाटकर : वाळव्यात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

Corruption with all parties of the ruling party | सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

Next

वाळवा : सहकाराला खासगीकरणाकडे नेण्याचा मार्ग महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बनवला आहे. त्यातील काहीजण आज तुरुंगात आहेत. सर्व पक्षांना सत्तेत सामावून घेऊन भ्रष्टाचार करायचा, असाच यांचा पवित्रा असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी केले. भ्रष्टाचारमुक्त संस्था चालविणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. राजकीय मूल्यहीनतेची तत्त्वे देशाच्या मानगुटीवर बसली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, संकुलाच्या मार्गदर्शिका व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या पत्नी कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते.
पाटकर म्हणाल्या की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची जमीन विक्री राजकीय खरेदीदारांनीच केली आहे, परंतु क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांनी सहकारी तत्त्वाला कोठेही भगदाड पडू नये, याची जाणीव ठेवूनच हुतात्मा कारखान्याची उभारणी केली आहे. ‘हुतात्मा’ची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. जेथे ऊस पिकत नाही, तेथे साखर कारखाने आणि त्याद्वारे भूजल हडप करणे, याला आमचा कायमचा विरोध राहील.
भाई वैद्य म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीनंतर घटनेवर हल्ला करून देशाला यादवी युध्दाकडे नेले जात आहे. भाजप, नरेंद्र मोदी सत्तेवर नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेवर आला आहे. त्यांनी प्रारंभापासूनच घटनेला विरोध केला आहे. २०२४ नंतर पुढे निवडणुका होणार नाहीत, तर लष्कराच्या साहाय्याने हिटलरशाही सुरू होईल. त्यासाठी राजकारणाचा पट बदलून नव्याने मांडावा लागेल. सर्व पक्षांनी वास्तवतेचे भान ठेवणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करीत असताना ज्यांच्या पोटातील पाणीसुध्दा हालत नाही, ते श्रमजीवी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणवून घेणारे आता सरकारजमा झाले आहेत.
वैभव नायकवडी व सौ. नंदिनी नायकवडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.
हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या विस्तारीकरण बांधकामाचा प्रारंभ मेधा पाटकर व भाई वैद्य यांच्याहस्ते करण्यात आला. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. प्रा. राजा माळगी, प्रा. डॉ. जे. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)


व्यवस्था : विषमतेवर आधारित
मेधा पाटकर म्हणाल्या की, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी येणे म्हणजे जातीयवादाचे, धर्मांध शक्तींचे उफाळून येणे होय. ३५ लाख कोटीच्या घरातील भांडवलदारांना सूट मिळते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी विषमतेवर आधारित व्यवस्था उलटून टाकली पाहिजे. ३१ वर्षे लढून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे मिटलेले नाहीत. धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न हिणवून चालणार नाही.

वाळवा येथे बुधवारी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अरूण लाड, वैभव नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाई वैद्य, कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव उपस्थित होते.

Web Title: Corruption with all parties of the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.