सहकारी दूध संस्थातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार- राधाकृष्ण विखे पाटील
By संतोष भिसे | Published: September 26, 2022 10:53 PM2022-09-26T22:53:13+5:302022-09-26T22:53:55+5:30
जिल्ह्यातील लम्पीग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
सांगली : सहकारी दूध संघाच्या भ्रष्टाचाराची चौकशी आवश्यक आहे. 80 टक्के दूध व्यवसाय सहकारी संस्थांकडे होता. त्या बंद पडल्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांना भोगायला लागू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे मत महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील लम्पीग्रस्त जनावरांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. विखे -पाटील म्हणाले, "महानंद दूध संस्था तोट्यामुळे राष्ट्रीय डेअरी बोर्डकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध व्यवसायातील स्पर्धेपासून दूर पळता येणार नाही. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन करण्याबाबत धोरण राबवू."
लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुमारे 84 टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात हा आजार नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून राज्य शासनाकडून अधिकाधिक जनावरांना वेळेत आणि वेगवान पद्धतीने लसीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले. पशुवैद्यकीय क्षेत्रातील रिक्त जागा लवकर भरण्याबाबत शासन विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या आजाराच्या काळात खासगी डॉक्टर आणि पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले, त्यांच्या मानधनाविषयीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल.ते म्हणाले, गोहत्या बंदी आणि लंम्पी स्किन आजार याचा संबंध नाही. मोकाट जनावरे, गोशाळा, पांजरपोळ येथेही लसीकरण शंभर टक्के आहे. नगरपालिका क्षेत्रातदेखील लसीकरणाचे आदेश दिले आहेत.
पाटील म्हणाले, " काँग्रेसला देशात नेतृत्व राहिलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना जी काही अवस्था सुरू आहे, ती पाहता त्या पक्षात राहावे असे कोणाला वाटेल. भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे वैश्विक नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतले जातील. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा सध्या पक्षाचे काँग्रेस छोडो सुरू आहे त्यावर काम करणे गरजेचे आहे. तसेच, पाटील म्हणाले, मॉल आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल. यावेळी प्रांताधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार दगडू कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे आदि उपस्थित होते.