मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:03 IST2025-01-21T13:03:16+5:302025-01-21T13:03:48+5:30
मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाचे शिवधनुष्य

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत
सांगली : मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव दिल्ली दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या कामासाठी ९८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील मिरज-कोल्हापूर व मिरज-कुर्डूवाडी या दोनच लोहमार्गांचे दुहेरीकरण होणे बाकी आहे.
मिरज ते कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. हा मार्ग एकेरी असल्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे सोडण्यात अडचणी येतात. हा मार्ग दुहेरी झाला तरी कोल्हापुरातील फलाटांची मर्यादित संख्या हीदेखील रेल्वेपुढे मुख्य समस्या आहे. सध्या कोल्हापूर स्थानकाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची संख्या वाढू शकेल. पण, त्यासाठी कोल्हापूर ते मिरज हा मार्ग दुहेरी होण्याची आवश्यकता आहे.
४७ किलोमीटर अंतराच्या या मार्गाच्या दुहेरीकरणाचा आराखडा रेल्वेने यापूर्वीच तयार केला आहे. त्यासाठी ९८३ कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे. अर्थात, एका किलोमीटरचा हा खर्च २० कोटी ९३ लाख रुपये आहे. दुहेरीकरणाला मंजुरी मिळून त्याचे काम प्रत्यक्षात सुरु होईल, तेव्हा हा खर्च प्रतिकिलोमीटर ३० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च महाराष्ट्र शासन उचलेल अशी अपेक्षाही रेल्वेने ठेवली आहे. दुहेरीकरणाचा हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे ऑक्टोबर २०२२ मध्ये सादर करण्यात आला आहे. त्यावर रेल्वे मंत्रालय विचार करत असून, अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
भूसंपादनाचा खर्च मोठा
मिरज ते कोल्हापूर दरम्यान लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना बागायत शेती आहे. त्यामुळे दुहेरीकरणासाठी जमिनी घेताना भूसंपादनाला मोठा खर्च करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी लोहमार्गाला खेटूनच शेती आहे. अगदी मोजक्याच ठिकाणी रेल्वेची स्वत:ची जमीन शिल्लक आहे. त्याशिवाय कृष्णा व पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलांसह छोट्या-मोठ्या पुलांचाही मोठा खर्च करावा लागणार आहे.