कापसाची लागवड ६७ हेक्टरवरच!
By admin | Published: June 21, 2015 10:56 PM2015-06-21T22:56:20+5:302015-06-22T00:18:26+5:30
जत तालुक्यातील स्थिती : तांबेऱ्यासह प्रतिकूल हवामानाचा फटका
संख : दराची अनिश्चितता, दुष्काळी परिस्थिती, मशागतीचा वाढता खर्च, बोंडअळी व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे जत तालुक्यात ‘पाढरं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाची लागवड कमी झाली आहे. यावर्षी केवळ ६७ हेक्टर क्षेत्रावरच उन्हाळी कापसाची लागण झाली आहे. यामुळे उन्हाळी पीक म्हणून पिकविला जाणारा कापूस आठवडा बाजारातून हद्दपार झाला आहे. जुलै-आॅगस्टमध्ये बाजारात विक्रीला येतो. यावर्षी कापूस तस्करही थंडावणार आहेत.
अवकाळी पावसाने दडी दिल्याने तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. परिणामी कापूस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. दर हेक्टरी घट होणार आहे. लागणीचा कापूस सध्या फुलोऱ्यात आहे. बोंडे कमी सुटणार आहेत.
तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने द्राक्ष, डाळिंंब, फळबागानंतरचे कापूस हे हमखास उत्पन्न मिळणारे एकमेव पीक आहे. निसर्गाच्या चक्रात तालुका होरपळून निघाल्याने या नगदी पिकाची मोठी वाताहत झाली. लागण कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.
एल.आर.ए. ५१६६, वरलक्ष्मी संकर ४, इशा गोल्ड ३०, पाळमूर, पारिजात, राशी २०००, सुपर फायबर (कृषीधन) निर्मल ९९९ अशा कापसाच्या अनेक जाती प्रचलित आहेत. कमी पावसाच्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा व माणदेश आदी भागात संकरित जातीच्या कापसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. कर्नाटकातील विजापूर ही कापसाची मोठी बाजारपेठ आहे. वाहतूक खर्च कमी येतो, काटा पेमेंट मिळते.
तालुक्यात जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या पाण्याचीही तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी ६०० ते ७०० फुटापर्यंत खाली गेली आहे. ८ तलाव १ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. १८ गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाची लागण कमी झाली आहे. तसेच बाजारात कापसाच्या दराची अनिश्चितता आहे. कापूस एकाधिकार समिती नसल्याने व्यापार दर ठरवितात. कमी दर देऊन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते.
कापसाचा मशागतीचा खर्च वाढला आहे. रासायनिक व सेंद्रीय खताची मात्रा द्यावी लागते. औषधाची फवारणी करावी लागते. खत, औषधाच्या दरात वाढ झाली आहे. बी-बियाणे, कापूस वेचणी व जमिनीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. उत्पादनापेक्षा मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही.
बनावट, निकृष्ट बियाणांमुळे कापसाचे उत्पादन कमी निघत आहे. बदलत्या हवामानामुळे बोंडअळी व तांबेरा रोगाचाही प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे कापसाची लागण कमी झाली आहे.
कापसाची लागण २०१२ पासून कमी झाली आहे. २०११ मध्ये १४२५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागण झाली होती. २०१५ मध्ये केवळ ६७ हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे. २०१२ मध्ये १२० हेक्टर, २०१३ मध्ये २८० हेक्टर, २०१४ मध्ये २४५.५ हेक्टर क्षेत्रावर कापूस घेण्यात आला होता. (वार्ताहर)
दराची अनिश्चितता, वाढत्या मशागती खर्चामुळे शेतकरी इतर उन्हाळी पिके व डाळिंब, द्राक्षे फळबागांकडे वळला आहे. भाजीपाला घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे कापसाची लागण कमी झाली आहे.
- बाळासाहेब लांडगे,
कृषी अधिकारी, जत
पाणी असूनही लागवड नाही
जत पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आहे. त्या परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी कापसाची लागण केलेली नाही. कृषी विभागाच्या अहवालानुसार जत मंडळात ९ हेक्टर, शेगाव मंडलात ९ हेक्टर कापूस आहे. मका, ऊस पीक घेण्याकडे कल वाढला आहे. पाणी असूनही शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
लागवड कमी झाल्याने संख, उमदी, माडग्याळ, दरीबडची, डफळापूर, शेगाव, कोंत्यावबोबलाद, तिकोंडी या ठिकाणच्या आठवडा बाजारातून कापूस हद्दपार झाला आहे.
कापसाची लागण २०१२ पासून कमी झाली आहे. २०११ मध्ये १४२५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागण झाली होती. २०१५ मध्ये केवळ ६७ हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा झाला आहे.