खड्ड्यांची संख्या मोजा अन् बक्षीस मिळवा!
By admin | Published: August 8, 2016 11:13 PM2016-08-08T23:13:14+5:302016-08-08T23:38:22+5:30
इस्लामपूर नगरपालिकेचे वाभाडे : आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या आयोजनाची वाहनधारकांची मागणी
अशोक पाटील --इस्लामपूर --आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्ली-बोळातील फुटकळ नेतेही स्वत:चा वाढदिवस साजरा करत आहेत. स्वत:च खर्च करून वाढदिवसाचा ढोल वाजवणाऱ्या या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला शहरातील खड्डे मोजण्याची स्पर्धा भरवावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुचाकीस्वारांचे जीवघेणे ठरत आहेत. मात्र पालिका प्रशासनाने याची कसलीही दखल घेतलेली नाही.
पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अंबिका उद्यानाच्या उद्घाटनासाठी ‘सैराट’फेम रिंकू राजगुरूच्या उपस्थितीमुळे ऐन पावसाळ्यातही राष्ट्रवादीची हवा चांगलीच गरम झाली आहे, तर विरोधी गट गारठला आहे. त्यामुळे पालिकेतील पक्षप्रतोदांसह नगराध्यक्ष आणि पदाधिकारी सैराट झाले आहेत. या नेत्यांच्या जिवावर काही ठेकेदारांची मक्तेदारी झाली आहे. या ठेकेदारांनी केलेली विकास कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामध्ये शहरातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचा समावेश आहे.
काँग्रेसचे वैभव पवार, विजय पवार यांनी रस्ते दर्जेदार व्हावेत म्हणून प्रामाणिकपणे विरोध केल्याचा दावा केला आहे. परंतु रस्त्यांची कामे नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाची झाली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर आता विजय पवार यांनी पलटवार करत रस्ते विरघळल्याचा दावा केला आहे.
जुन्या बहे नाक्यापासून साखराळे हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या बांधण्यात आलेल्या मालमत्ताधारकांकडून इस्लामपूर पालिका कर वसुली करते. परंतु इस्लामपूर-बहे मुख्य रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो म्हणून त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
बांधकाम विभाग जुजबी डागडुजी करण्यापलीकडे काहीही करत नाही. यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
आॅगस्ट महिन्यातच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीची हवा गरम होणार आहे. मतदारांच्या दारात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटतील, यात शंका नाही. यासाठी मतदार दारात रंगीबेरंगी रांगोळ्या काढून लक्ष्मीचे स्वागतही करतील. परंतु मतदारांना मतदानासाठी जाताना शहरातील खड्ड्यातूनच जावे लागणार आहे, याचे भान ठेवावे, हीच अपेक्षा.
मुख्यमंत्र्यांचा दौरा : रस्ते कात टाकणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत मंत्री झाले आहेत. त्यांच्या मुलाचा विवाह औद्योगिक वसाहतीतील सभागृहामध्ये होत आहे. या विवाहास मुख्यमंत्र्यांसह बहुतांशी मंत्री येणार असल्याचे समजते. त्यामुळे इस्लामपूर ते संबंधित सभागृहापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी युध्दपातळीवर केली जाणार असल्याचे समजते. कृषी व पणन खाते खोत यांच्याकडे आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्तेही आता कात टाकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.