बड्या थकबाकीदारांचे काऊंटडाऊन सुरू...
By admin | Published: July 1, 2015 11:20 PM2015-07-01T23:20:25+5:302015-07-02T00:23:52+5:30
जिल्हा बँक : कारवाईची टांगती तलवार
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सक्षमतेचा भाग म्हणून आता बड्या तीस थकबाकीदारांच्या वसुलीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्जदारांवरील कारवाईचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. थकबाकीदारांमध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह बड्या संस्थांचा समावेश असल्याने संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असली तरी, ती अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. नफ्यात असलेल्या या बँकेची वसुलीही चांगली आहे. ऊस उत्पादकांकडील थकित रकमेची वसुली थांबली असली तरीही, सध्याच्या वसुलीची टक्केवारी अत्यंत चांगली आहे. तरीही बड्या थकबाकीदारांकडील रकमा वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या यादीत ६0 संस्थांचा समावेश असून यातील बड्या ३0 थकबाकीदारांकडे एकूण २0५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखानाही या ३0 थकबाकीदारांमध्ये आहे. त्यांच्या थकित कर्जाच्या वसुलीसंदर्भात जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी यापूर्वीच चर्चा केली आहे.
अन्य थकबाकीदारांशीही आता बँकेच्या थकित रकमेबाबत चर्चा सुरू आहे. थकित रकमांच्या वसुलीसाठी कारवाईसुद्धा केली जाणार आहे. वसुलीसाठी आता बँकेची पावले गतीने पडू लागल्याने थकबाकीदार संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)