सांगलीतील बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, आठ लाखांच्या नोटा जप्त; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:06 AM2022-06-01T11:06:51+5:302022-06-01T11:27:54+5:30
बनावट नोटा वापरात आणण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश
इस्लामपूर : आयसीआयसीआय बँकेच्या येथील शाखेतील पैसे भरण्याच्या डिपॉझिट मशीनमध्ये तीन हजारांच्या बनावट नोटा भरून त्या वापरात आणण्याऱ्या टोळीचा इस्लामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य संशयिताच्या सांगलीतील घरावर छापा टाकून पोलिसांनी ७ लाख ६६ हजारांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य ताब्यात घेऊन कारखाना उद्ध्वस्त केला. यात चार संशयितांना अटक करण्यात आली.
एचडीएफसी बँकेतील अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी याने ५०० रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याच्या माहीत असतानाही त्या डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या होत्या. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात १९ मे रोजी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी संग्राम सूर्यवंशीकडे केलेल्या तपासात पिंटू निवृत्ती पाटील (रा. कामेरी), सुरेश नानासाहेब पाटील (रा. एखतपूर-सांगोला), मुख्य सूत्रधार श्रीधर बापू घाडगे (रा. सोनारसिद्धनगर, आटपाडी, सध्या संजयनगर, सांगली), रमेश ईश्वर चव्हाण (रा. आटपाडी) यांची नावे निष्पन्न झाली.
श्रीधर घाडगे याच्या सांगलीतील भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. तो त्याच्या मोटारीतून घाईगडबडीने जात असताना दिसला. त्याच्या मोटारीची झडती घेतल्यावर ५००, २००, १००, ५० आणि २० रुपयांच्या एकूण ६ लाख ९४ हजार २५० रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल मिळून आले. त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांची छपाई करण्याचे साहित्य मिळून आले. या बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरलेला प्रिंटर आणि ७२ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. घाडगेने पाण्याच्या टाकीत लपवून ठेवलेले इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करून चौघांच्या मुसक्या आवळल्या, तर रमेश चव्हाण पसार झाला. चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, अशोक महापुरे, उत्तम माळी, अरुण कानडे, शरद बावडेकर, प्रशांत देसाई, अमोल सावंत, गणेश शेळके, सूरज जगदाळे, कौस्तुभ पाटील आणि ‘सायबर क्राईम’चे विवेक साळुंखे यांनी भाग घेतला.