विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 12:47 PM2022-01-01T12:47:33+5:302022-01-01T12:48:46+5:30
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने देशातील एकमेव कुस्ती संकुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या संकुलात पाचशेहून अधिक मल्ल कुस्तीचे धडे घेणार आहेत.
दिलीप मोहिते
विटा : विटा शहरात आता देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा साकारत आहे. भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने देशातील एकमेव कुस्ती संकुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या संकुलात पाचशेहून अधिक मल्ल कुस्तीचे धडे घेणार आहेत.
विट्यापासून दोन किलाेमीटरवर नवीन भाळवणी रस्त्यालगत भारतातील पहिला सर्वसोयींनीयुक्त राष्ट्रकुल कुस्ती आखाडा उभा राहत आहे. सुमारे १५ कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या या कुस्ती आखाड्यात मल्लांना लाल माती व मॅटवरील कुस्तीचे धडे दिले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील मुलांना कोल्हापूर, पुण्यासारख्या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षणासाठी जाता येत नाही. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या भागात अत्याधुनिक व सर्वसोयींनी युक्त कुस्ती आखाडा उभारणी करण्याची संकल्पना पुढे आणली. ही संकल्पना त्यांचे वडील सुभाष शंकरराव पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ विटा पालिका हद्दीतील त्यांची स्वमालकीची तीन एकर जागा संकुलासाठी दिली. या जागेत संकुल उभे राहत आहे. त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
साडेपाच हजार चाैरस फुटाचा कुस्ती आखाडा व व्यायामाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. जीम, मुलांच्या पायाच्या जड व्यायामासाठी स्टेडियम, प्रशिक्षक निवासस्थानाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. संकुलात जलतरण तलाव, रबरी धावपट्टी, दोन मॅटचे आखाडे, प्रशिक्षणार्थी मुलांसाठी पाच बसेस यासह अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार करणार
अत्याधुनिक व सर्वसोयींनी युक्त अशी कुस्ती संकुले परदेशात आहेत. परंतु, विटासारख्या शहरात राष्ट्रकुल कुस्ती संकुलाची उभारणी होत आहे. आपल्या भागातील मुलांसाठी हे संकुल नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या कुस्ती संकुलात आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.